मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यामध्ये सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) झंझावाती खेळी करताना 31 चेंडूत 65 धावा केल्या. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 19 चेंडूत 35 आणि इशान किशनने 31 चेंडूत 34 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर हर्षल पटेलने जबरदस्त गोलंदाजी करत 22 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 2, दीपक चहरने 2 आणि शार्दुल ठाकूरने 2 बळी घेतले. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारताचा हा सलग तिसरा क्लीन स्विप मालिका विजय आहे.
भारताचा पूर्ण वेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माची गाडी सुस्साट निघाली आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने आधी न्यूझीलंडचा टी-20 मालिकेत 3-0 असा पराभव केला. त्यानंतर वेस्ट इंडिजवर एकदिवसीय मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. त्यानंतर आता वेस्ट इंडिजवर टी-20 मालिकेतही 3-0 असा क्लीन स्विप विजय मिळवला आहे. दरम्यान, रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, कर्णधारपदाशी संबंधित हा रेकॉर्ड नेमका काय आहे. तर हे आकडे मायदेशात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याशी संबंधित आहेत. या बाबतीत रोहित शर्माने भारतीय विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हिटमॅनने कर्णधार म्हणून विराट कोहलीचा भारतीय विक्रम मोडला आहे. वेस्ट इंडिजवर 3-0 अशा विजयासह एकूण 14 विजयांसह, तो आता कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. भारतीय भूमीवर विराट कोहलीने 13 टी-20 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर एमएस धोनी या यादीत 10 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहितने सध्या भारतीय कर्णधाराचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत या बाबतीत विश्वविक्रम मोडण्याचीदेखील संधी असेल, ज्यापासून तो फक्त दोन पावलं दूर आहे. मायदेशात जगातील सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारे कर्णधार म्हणजे इंग्लंडचा ओईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन हे आहेत. हे दोन्ही कर्णधार 15 विजयांसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत.
भारताला आता श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत टीम इंडियाने ही मालिका जिंकली तर रोहित शर्मा विश्वविक्रम आपल्या नावावर करेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये होणार आहे. तर उर्वरित 2 टी-20 सामने धर्मशाला येथे खेळवले जातील. ही टी20 मालिका 27 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे या मालिकेतले दोन सामने जरी भारताने जिंकले तरी जागतिक विक्रम रोहितच्या नावावर असेल.
इतर बातम्या
IND vs WI : वेस्ट इंडिजचा कंजूष गोलंदाज, ज्याच्यासमोर रोहित-इशान आणि विराटही हतबल
IND vs WI : पहिल्या 5 चेंडूत 2 DRS, दोन्ही सक्सेसफुल, पण फायदा टीम इंडियालाच! नेमकं घडलं काय?