बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव गैरहजर राहिला. मात्र उर्वरित तीन सामन्यात त्याची कामगिरी सुमार राहिली. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात त्यानेच माघार घेतल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी हा निर्णय घेण्यामागे बरीच कारणे असून शकतात. रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दिचा मेलबर्न कसोटी सामना हा शेवट असू शकतो. रिपोर्टनुसार, बीसीसीआय सिलेक्टर्सने त्याला स्पष्ट सांगितलं आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याला कसोटीत स्थान मिळणं कठीण आहे. रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळत नाही. कर्णधार आणि फलंदाज म्हणून दोन्ही स्तरावर रोहित शर्मा निष्फळ ठरला. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित शर्मासोबत बैठक केली आणि शेवटच्या सामन्यात ड्रॉप करण्यावर मोहोर लागल्याचं सांगण्यात येत आहे. रोहित शर्माने पाच कसोटी डावात फक्त 31 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही काही खास केलं नाही. मागच्य 8 कसोटीत फक्त एक अर्धशतक ठोकलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय कसोटी संघ आता कात टाकत आहे. त्यामुळे निवड समितीने रोहित शर्माला त्याच्या भवितव्याबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं आहे. इतकंच काय तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विराट कोहलीशी चर्चा करणार आहेत. त्याच्यासोबत एक मीटिंग घेतली जाईल आणि संघाच्या भवितव्याबाबत चर्चा केली जाईल. या दरम्यान त्याला प्लान काय ते देखील विचारलं जाईल. त्यानंतर त्याच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाईल. टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू असलेला आर अश्विन आधीच निवृत्ती घेऊन मोकळा जाला आहे. तर रोहित शर्मासाठी मेलबर्न कसोटी शेवटची असेल. आता विराट कोहलीबरोबर चर्चा केली जाणार आहे.
दुसरीकडे, अष्टपैलू रवींद्र जडेजाची कसोटीतील भूमिका खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याचं संघातील स्थान अबाधित राहिल असं सांगितलं जात आहे. कारण आर अश्विन गेल्यानंतर तितक्या ताकदीचा गोलंदाज अजून तरी तयार झालेला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाला कसोटी खेळवण्याचा विचार केला जात आहे. रवींद्र जडेजा संघात राहील. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि इतर खेळाडूंना तयार करण्यास मदत करेल.