एकदाचं ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत कोण असणार कर्णधार? जय शाह म्हणाले…

| Updated on: Jul 07, 2024 | 3:44 PM

टी20 वर्ल्डकप विजयानंतर आयसीसी चषकांचा दुष्काळ संपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढच्या स्पर्धांचे वेध लागले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी बीसीसीआयने आताच कंबर कसली असून कोणच्या खांद्यावर धुरा असणार हे स्पष्ट केलं आहे.

एकदाचं ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत कोण असणार कर्णधार? जय शाह म्हणाले...
Follow us on

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टी20 वर्ल्डकपबाबत केलेली भविष्यवाणी कर्णधार रोहित शर्माने खरी करून दाखवली. त्यानंतर बीसीसीआयने पुन्हा एकदा नव्या चषकासाठी कंबर कसली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे टी20 फॉर्मेटचा प्रश्नच येत नाही. पण वनडे आणि टेस्ट क्रिकेट हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम इंडियाची धुरा कोण सांभाळणार? याची खलबतं सुरु होती. मात्र या सर्व चर्चांवर आता पडदा पडला आहे. कारण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे. जय शाह यांनी सांगितलं की, ‘रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया पुढच्या वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणार.’ याचाच अर्थ असा की या दोन्ही स्पर्धांमध्ये संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार हे स्पष्ट झालं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही वनडे असून रोहित शर्मा कसोटी आणि 50 षटकांचा सामना खेळणार आहे.

जय शाह यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितलं की, ‘टीम इंडियाला ऐतिहासिक विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. हा विजय मी प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांना समर्पित करतो. मागच्या एका वर्षात आपली ही तिसरी अंतिम फेरी होती. जून 2023 मध्ये आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हरलो. नोव्हेंबर 2023 मध्ये दहा विजयानंतर आपण मनं जिंकली पण कप जिंकलो नाहीत.’

‘मी राजकोटमध्ये बोललो होतो की 2024 मध्ये आम्ही सर्वांची मनं जिंकू. कपही जिंकणार आणि भारताचा झेंडा गाडणार. आमच्या कर्णधाराने झेंडा गाडला आहे. या विजयात शेवटच्या पाच षटकांचं मोठं योगदान होतं. या योगदानासाठी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांचे आभार व्यक्त करतो. या विजयानंतर पुढचं लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी असेल. मला पूर्ण विश्वास आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वात आम्ही या दोन्ही स्पर्धा जिंकू.’