टीम इंडियाकडे टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताची वाट अडवली होती. टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला होता. ही टीम इंडियाला झोपेतून जागं करणारी घडामोड होती असा टोला माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मारला आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात रोहित-विराटने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नव्हती असा आरोप संजय मांजरेकर यांनी केला आहे. त्यामुळेच टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं, असंही त्यांनी पुढे सांगितलं. या सामन्यात रोहित शर्माने 28 चेंडूत 27 धावा, तर विराट कोहलीने 40 चेंडूत 50 दावा केल्या होत्या. भारताने 20 षटकात 6 विकेट गमवून 168 धावा केल्या. या धावा इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमवता पूर्ण केल्या.
“भारताचा टी20 संघ पूर्णपणे बदलला आहे. 2022 वर्ल्डकपमधील पराभव हा वेक अप कॉल होता. पण ते काही मान्य करणार नाही. रोहित आणि विराट हे कधीच कबूल करणार नाहीत की त्यांचा पराभवात वाटा होता. पण नवी टीम इंडिया खूपच वेगळी आहे.”, असं संजय मांजरेकर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. “भारतासाठी जमेची बाजू म्हणजे इंग्लंड संघ मागच्या वेळेपेक्षा थोडा कमकुवत दिसत आहे. त्यामुळे पुढे जाण्यास भारताला मदत होईल.”, असंही संजय मांजरेकर पुढे म्हणाला.
संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या फॉर्मबाबतही चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात 66 धावा केल्या आहेत. 1,4,0,24,37 आणि 0 अशी धावसंख्या सहा सामन्यात अनुक्रमे आहे. “विराट कोहली हा चिंता वाटणारा विषय आहे. त्याच्याकडून हव्या तश्या धावा झाल्या नाहीत. पण जोखिम घेण्यात कुठेच मागे पडलेला नाही. तसेच बाद होण्याची चिंता नाही.उपांत्य फेरीतही त्याचा असाच मानस असेल यात शंका नाही. आता चौकार षटकाराची निवड करतो की सिंगलची हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तेव्हाच त्याच्या फलंदाजीतील वेगळेपण दिसून येईल.”, असं संजय मांजरेकर यांनी सांगितलं.