मुंबई : टीम इंडियाने न्यूझीलंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. न्यूझीलंडने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र अखेर टीम इंडियाचा विजय झाला. या सामन्यादरम्यान एका दिग्गज खेळाडूने क्रिकेट विश्वाला अलविदा केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम अमला याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. अमलाने याआधीच 2019 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता अमलाने काउंटी क्रिकेटमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
“माझ्याकडे ओव्हल मैदानातील खूप चांगल्या आठवणी आहे. मी एलेक स्टीवर्ट आणि संपूर्ण सरे स्टाफची, खेळाडू आणि सदस्यांचे आभार मानतो. मी सरेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच सरेने जेतेपद जिंकावं, अशी आशा आहे”, अशी प्रतिक्रिया अमलाने दिली.
अमला म्हणजे प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखीच. अमला मैदानात आला की घट्ट पाय रोवून उभा राहणार म्हणजे राहणार. अमला क्वचित वेळाच स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे अमलाला झटपट आऊट करायचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर असायचं. अमलाने 124 कसोटी सामन्यांमध्ये 9 हजार 282 धावा केल्या आहेत. यामध्ये 28 शतक आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच अमला दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत त्रिशतक ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. अमलाने कसोटीत 311 धावांची खेळी केली होती.
कसोटीशिवाय अमलाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 181 सामने खेळले आहेत. या 181 सामन्यात अमलाने 8 हजार 113 धावा केल्या आहेत. अमलाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 27 शतक आणि 29 अर्धशतक ठोकले आहेत. तसेच 44 टी 20 सामन्यातही अमलाने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. अमलाने टी 20 क्रिकेटमध्ये 1 हजार 277 धावा केल्या आहेत.