दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेने 7 वेळा अपयशी ठरल्यानंतर अखेर आठव्या प्रयत्नात वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये 27 जून रोजी अफगाणिस्तानवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 57 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 8.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. अफगाणिस्तानचं या पराभवासह आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत टीम इंडिया-इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध भिडणार आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने 5 धावा केल्या. तर रिझा हेंडीक्स आणि कॅप्टन एडन मारक्रम या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. क्विंटन डी कॉक 5 धावांवर आऊट झाला. त्यानंतर रिझा आणि एडन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी याने एकमेव विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी अफगाणिस्तान कॅप्टन राशिद खान याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तान सपेशल अपयशी ठरली. अफगाणिस्तानला धड 12 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 56 धावांवर गुंडाळलं. अफगाणिस्तानसाठी एकट्या अझमतुल्लाह याने दुहेरी आकडा गाठला. अझमतुल्लाहने सर्वाधिक 10 धावा केल्या. तिघांना खातंही उघडता आलं नाही. तर एकटा 2 धावांवर नाबाद राहिला. तर उर्वरित फलंदाजांपैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जान्सेन आणि तबरेझ शम्सी या दोघांनी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर कगिसो रबाडा आण एनरिच नॉर्खिया या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या.
दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये धडक
A dominant display with the ball puts South Africa through to the Men’s #T20WorldCup Final for the very first time 👌
📝 #SAvAFG: https://t.co/iy7sMxLlqY pic.twitter.com/Ep8VzuVMiE
— ICC (@ICC) June 27, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम(कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.