SA vs BAN : दक्षिण अफ्रिकेचा बांगलादेशला व्हाईट वॉश, WTC 2025 स्पर्धेत विजयी टक्केवारी वाढली

| Updated on: Oct 31, 2024 | 5:15 PM

बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 2-0 ने विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने एक डाव आणि 273 धावांनी विजय मिळवला. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.

SA vs BAN : दक्षिण अफ्रिकेचा बांगलादेशला व्हाईट वॉश,  WTC 2025 स्पर्धेत विजयी टक्केवारी वाढली
Image Credit source: Twitter
Follow us on

दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला त्यांच्याच भूमीत 2-0 ने पराभूत केलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर एडन मार्करमने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली आणि 575 धावांचा डोंगर रचला. टोनी डी जॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स आणि मुल्डरने शतकी खेळी केली. या खेळीमुळे बांगलादेशला डोकंच वर काढता आलं नाही. दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेने 575 वर 6 विकेट असताना डाव घोषित केला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी बोलवलं. दुसऱ्या दिवस अखेर बांगलादेशच्या 34 वर 4 विकेट गेल्या होत्या. त्यामुळे हा सामना पूर्णत: दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 159 धावांवर बाद झाला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेकडे मोठी आघाडी असल्याने फॉलोऑन दिला. फॉलोऑनचं लक्ष्य पूर्ण करताना बांगलादेशची पुन्हा फजिती झाली आणि संपूर्ण संघ अवघ्या 143 धावांवर तंबूत परतला. दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशवर 1 डाव आणि 273 धावांनी विजय मिळवला. दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला आहे.

दक्षिण अफ्रिकेकडून पहिल्या डावात कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या होत्या. डेन पीटरसन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर सेनुरन मुथुसामीला एक विकेट घेण्यात यश आलं. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात कागिसो रबाडा काही चालला नाही. पण केशव महाराजने कमाल केली. त्याने 5 विकेट घेत बांगलादेशचं कंबरडं मोडलं. तर सेनुरन मुथुसामीने 4 विकेट घेतल्या. तर डेन पीटरसनच्या वाटेला एक विकेट आली. बांगलादेशला पराभूत केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने प्रतिक्रिया नोंदवली. ‘अजून बरेच कसोटी सामने होणार आहेत. या पर्वात एका पाठोपाठ एक कसोटी मालिका आहेत. आम्हाला आशा आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी नक्कीच पोहोचू.’, असं एडन मार्करमने सांगितलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या गुणतालिकेत या विजयानंतर फरक पडला आहे. दक्षिण अफ्रिकेच्या विजयी टक्केवारीत फरक पडला आहे. न्यूझीलंडला मागे टाकत दक्षिण अफ्रिकेने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण अफ्रिकेला आता फक्त दोन कसोटी मालिकेतील 4 सामने खेळायचे आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन संघ सामने असतील. विशेष म्हणजे हे सामने दक्षिण अफ्रिकेत होणार आहेत. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 54.17 टक्के झाली आहे. भारताची विजयी टक्केवारी 62.82, ऑस्ट्रेलियाची 62.50, श्रीलंकेची 55.56, तर न्यूझीलंडची विजयी टक्केवारी ही 50 टक्के आहे.