भारतीय क्रिकेट संघाने संजू सॅमसन याच्या विस्फोटक शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20i सामन्यात 61 धावांनी मात केली. संजू सॅमसन याने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने 202 धावांपर्यंत मजल मारली. मात्र दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजासंमोर गुडघे टेकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दक्षिण आफ्रिकेचा डाव हा 17.5 ओव्हरमध्ये 141 धावांवर आटोपला. यासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करत 1-0 ने आघाडी घेतली. भारताचा हा डरबनमधील पाचवा तर एकूण सलग 11 वा विजय ठरला. मात्र या सामन्यातील दुसऱ्या डावात जे काही झालं, त्याचीच चर्चा जास्त रंगली आहे. नक्की काय झालं? जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका 203 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरली. तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 15 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मार्को जॅन्सन आणि टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आपसात भिडले. रवी बिश्नोई टीम इंडियाकडून बॉलिंग टाकत होता. बिश्नोईच्या या ओव्हरमधील दुसर्या बॉलवर मार्कोने एकेरी धाव घेतली. त्यानंतर मार्को जॅन्सन संजू सॅमसनला काही तरी बोलला. संजू सॅमसनने पीचवरील डेंजर एन्डवर येत बॉल कलेक्ट केला. त्यामुळे मार्कोने नाराजी व्यक्त केली. मार्को संजूला काही तरी बोलतोय हे पाहून कॅप्टन सूर्या तिथे आला. सूर्याने विषय जाणून घेतला आणि मार्कोची बोलती बंद केली. हे पाहता पाहता पंच तिथे आले आणि मध्यस्थी केली.
दरम्यान संजू सॅमसनच्या टी 20i कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. संजूने 12 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध शतक केलं होतं. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 7 फोरसह 107 रन्स केल्या. संजूला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
एकट्या सूर्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोघांना सुनावलं
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) November 8, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.