टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील टी 20I मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजासाठी भाग पाडलं. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी 24 धावांची सलामी भागीदारी केली. गेराल्ड कोएत्झी याने त्याच्या कोट्यातील पहिल्या आणि सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर अभिषेक शर्मा याला आऊट करत ही जोडी फोडली. एडन मार्करम याने अभिषेकने मारलेला फटक्याचा उलट दिशेने धावात अप्रतिम कॅच घेतला. त्यामुळे अभिषेक 7 धावांवर बाद झाला. मात्र सूर्याने कोएत्झीला याच ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकत मोठा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.
अभिषेकनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. कोएत्झीने टाकलेल्या शॉट बॉलवर सूर्याने अप्रितम षटकार खेचला. सूर्या यासह टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा तिसरा फलंदाज ठरला. सूर्याने वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन याचा रेकॉर्ड ब्रेक केला. सूर्याने पूरनचा 144 षटकारांचा विक्रम उद्धवस्त केला. निकोलसने 98 सामन्यांमधील 90 डावात 144 सिक्स लगावले आहेत. मात्र सूर्याने अवघ्या 75 व्या सामन्यातील 72 व्या डावातच 145 वा सिक्स ठोकत पूरनला पछाडलं. त्यामुळे निकोलसची टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन गुप्टील आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.