टी 20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आपला दबदबा कायम राखत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. भारताने 8 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवर डर्बन येथे झालेल्या सामन्यात 61 धावांनी विजय मिळवला आणि 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताचा हा सलग 11 वा टी 20i विजय ठरला. संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने 50 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 7 फोरसह 107 रन्स केल्या. संजूला या शतकी खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडियाच्या धमाकेदार विजयानंतर कर्णधार सर्यकुमार यादव याने आनंद व्यक्त केला. तसेच सूर्याने संजूच्या या खेळीचं तोंडभरुन कौतुक करत त्याच्या गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा उल्लेख केला. “जसं मी म्हटलं टॉसआधी आणि पत्रकार परिषद म्हटलं होतं की मुलांनी माझं काम सोपं केलं आहे. टीममध्ये मला कोणतंही ओझं उचलायला लागत नाही. खेळाडू निर्भीडपणे खेळत आहेत. खेळाडू मैदानात आणि मैदानाबाहेर मजा घेत आहेत. सुरुवातीच्या षटकांमध्ये आम्ही नक्की विकेट्स गमावल्या, मात्र आम्ही अशाच प्रकारे न घाबरता क्रिकेट खेळू इच्छितो. हा एक टी 20 गेम आहे. आम्हाला माहित आहे की हा 20 षटकांचा खेळ आहे, पण जर तुम्ही 17 ओव्हरमध्ये 200 धावा करु शकता मग तसं का करु नये”, असं सूर्याने म्हटलं.
सूर्यकुमार यादवने संजूच्या शतकी खेळीचं भरभरून कौतुक केलं. “संजूने गेल्या काही वर्षांमध्ये मेहनत केली आहे. हे सर्व मेहनतीचं फळ आहे”, असं सूर्याने म्हटलं. तसंच सूर्याने फिरकी गोलंदांजांही कौतुक केलं. “ही आमची रणनिती होती. आम्ही हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेटच्या प्रतिक्षेत होता. फिरकी गोलंदाजांनी या दोघांना आपल्या जाळ्यात फसवलं ते अविश्वसनीय होतं”, असं सूर्याने स्पष्ट केलं. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.