SA vs IND 1st T20I | टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका पहिला सामना पावसामुळे रद्द

| Updated on: Dec 10, 2023 | 10:06 PM

South Africa vs India 1st T20I Match | क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. पावसामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना अखेर रद्द केला गेला आहे.

SA vs IND 1st T20I | टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका पहिला सामना पावसामुळे रद्द
Follow us on

डरबन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे अखेर रद्द करण्यात आलेला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन सामना रद्द करण्यात आल्याची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांना निराश होऊन मैदानातून बाहेर जावं लागलं आहे. या पहिल्या सामन्याचं आयोजन हे डरबनमध्ये करण्यात आलं होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार पाऊस आला आणि सामना रद्दच करावा लागला. आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना हा एका दिवसानी होणार आहे.

उभयसंघातील पहिल्या सामन्याआधी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता टॉस तर 7 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणार होती. क्रिकेट चाहते सामन्यासाठी उत्सूक होते. कुणी सहकुटुंब तर कुणी मित्रपरिवारासह सामना पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित होते. मात्र टॉसआधी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मैदानातील मुख्य खेळपट्टी आणि आसपासचा भाग हा कव्हर्सने झाकलेला होता. सामना आता थांबेल नंतर थांबेल असं म्हणत क्रिकेट चाहते प्रतिक्षा करत होते. मात्र पाऊस काही थांबला नाहीच. अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर नाईलाजाने सामने रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

पहिल्या सामन्यात पावसाचा विजय

दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.