वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, स्टार बॉलर वर्ल्ड कपनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज

| Updated on: Dec 13, 2024 | 12:37 AM

Odi Series : निवड समितीने एकूण 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेतून टीममध्ये वेगवान गोलंदाजाचं आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर कमबॅक झालं आहे.

वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, स्टार बॉलर वर्ल्ड कपनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज
icc odi world cup 2023
Follow us on

दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात श्रीलंकेला कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश केला. दक्षिण आफ्रिकने यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसर्‍या साखळी फेरीतील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. निवड समितीने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टेम्बा बावुमा हाच दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकेची ही चॅम्पियन्स ट्रॉफीआधीची  शेवटची मालिका आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वाची आहे.

सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका होणार आहे. तर कसोटी मालिकेने पाकिस्तानच्या या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची सांगता होणार आहे. वनडे सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 22 डिसेंबरला होणार आहे. तर दुसरा सामना हा 19 डिसेंबला खेळवण्यात येणार आहे.

कुणाचं कमबॅक?

दक्षिण आफ्रिकेच्या संघात आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याचं पुनरागमन झालं आहे. रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत खेळला होता. हा त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना होता.  त्यानंतर आता तो पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तसेच डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन हे वर्षभरानंतर संघात परतले आहेत. या दोघांना डिसेंबर 2023 नंतर संधी देण्यात आली आहे. तसेच युवा गोलंदाज क्वेना मफाका याची पहिल्यांदाच संघात निवड करण्यात आली आहे.

मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, मंगळवार 17 डिसेंबर, बोलँड पार्क, पर्ल.

दुसरा सामना, गुरुवार 19 डिसेंबर, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.

तिसरा सामना, रविवार 22 डिसेंबर, वांडर्रस स्टेडियम, जोहान्सबर्ग.

तर दुसऱ्या बाजुला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 4 डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i, वनडे आणि कसोटी या तिन्ही मालिकांसाठी एकत्रच संघ जाहीर केला होता. त्यानुसार मोहम्मद रिझवान हाच टी 20i नंतर वनडे सीरिजमध्येही नेतृत्व करणार आहे.

वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा

पाकिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, टोनी डी जॉर्जी, मार्को यानसेन, हेनरिक क्‍लासेन, केशव महाराज, क्‍वेना मफाका, एडन मार्करम, डेविड मिलर, एंडिल फेहलुकवायो, कगिसो रबाडा, ट्रिस्‍टन स्‍टब्‍स, रेयान रिकलटन, तबरेज शम्‍सी आणि रासी वान डर डसेन.

वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, हारिस रऊफ, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयूब, सलमान अली आगाह, शाहीन शाह अफरीदी, सुफियान मुकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान.