महान प्रशिक्षक सर रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाच्या अनावरणानिमित्ताने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले. तेव्हापासून ते आतापर्यंत दोघेही पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. दोघांमध्येही तुलना केली जातेय. सचिनने शिस्तीच्या जोरावर यशाची शिखरं पादक्रांत केली. तर विनोद सचिनच्या तुलनेत यशस्वी होऊ शकला नाही. सचिन आणि कांबळी दोघांनाही आचरेकर सरांनीच क्रिकेट शिकवलं. दोघांची सुरुवातही आसपास झाली. मात्र सध्याच्या घडीला सचिन कोट्याधीश आहे. तर कांबळीला बीसीसीआयकडून मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर गुजराण करावी लागतेय.
लहानपणीचे मित्र सचिन आणि कांबळी दोघेही जवळपास सारख्याच वयाचे आहेत. सचिनने 1989 तर कांबळीने 1991 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. कांबळीची तेव्हा सचिनसोबत तुलना केली जायची. सचिननंतर कांबळी नवा स्टार खेळाडू, असं म्हटलं जायचं. मात्र स्थिती बदलली. सचिनची क्रिकेटमुळे प्रतिष्ठा मिळवली तसेच कोट्याधीश झालाय. तर कांबळीची आर्थिक स्थिती त्याच्या तब्येतीप्रमाणे नाजूक झालीय.
सचिन तेंडुलकर जगातील आणि भारतातील श्रीमंतांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिनची संपत्ती 1400कोटी इतकी आहे. तसेच सचिनने क्रिकटमधील निवृत्तीनंतर आतापर्यंत जाहिरात आणि अनेक माध्यमातून कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार,सचिन बीएमडबल्यू इंडिया, एदीदास, कोलगेट, पेप्सी आणि व्हीझासह करारबद्ध आहे. तसेच आयपीएल आणि अन्य मार्गातून सचिन कमाई करतो.
सचिनचं मुंबईसह भारतातील इतर शहरांमध्ये आलिशान घरं आहेत. मीडिया रिपोट्सनुसार, सचिनच्या मुंबईतील वांद्रे येथील घराची अंदाजे किंमत ही 100 कोटी आहे. तसेच सचिनचं लंडनमध्येही घर असल्याचं म्हटलं जातं. सचिन कारप्रेमी आहे. सचिनच्या कलेक्शनमध्ये फेरारी, बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या महागड्या कार आहेत.
कांबळी क्रिकेट खेळायला लागल्यापासून सुरुवातीच्या काळात श्रीमंत होता. कांबळी कोट्याधीश होता. रिपोर्ट्सनुसार, कांबळी यशाच्या शिखरावर होता तेव्हा त्याच्याकडे 1 ते 1.5 मिलियन डॉलर होते. मात्र 2022 नंतर कांबळीकडे 4 लाख रुपये असल्याचं म्हटलं जातंय. सध्या कांबळीचा घरखर्च हा बीसीसीआयकडून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावर चाललाय. बीसीसीआयकडून निवृत्ती वेतन म्हणून दरमहा 30 हजार रुपये मिळतात, असं कांबळीनेच एका मुलाखतीत म्हटलेलं.