रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं शिवाजी महाराज पार्कात भूमिपूजन, उद्घाटन कधी?

| Updated on: Nov 21, 2024 | 4:05 PM

Ramakant Achrekar Memorial Bhumi Poojan : असंख्य क्रिकेटपटूंना घडवणाऱ्या सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आज दादर येथील शिवाजी महाराज पार्क येथे भूमीपूजन करण्यात आलं.

रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं शिवाजी महाराज पार्कात भूमिपूजन, उद्घाटन कधी?
Ramakant Achrekar Memorial Bhumi Poojan
Follow us on

रमाकांत आचरेकर, मुंबईला, भारताला आणि क्रिकेट विश्वाला एकसेएक आणि तोडीसतोड क्रिकेटपटू शोधून देणारे पारखी मार्गदर्शक. रमाकांत आचरेकरांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण अमरे, लालचंद राजपूत या आणि यासारखे अनेक दिग्गज खेळाडूंना क्रिकेटपटूंचं पाळणाघर असलेल्या दादरमधील शिवाजी महाराज पार्क येथे क्रिकेटची बाराखडी शिकवली. आचरेकर सरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर या आणि असंख्य क्रिकेटपटूंनी त्यांची कारकीर्द गाजवली. आचरेकर सरांनी खेळाडूंना या शिवाजी पार्क मैदानात मार्गदर्शन केलं. मात्र आता रमकांत आचरेकर सर आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या आठवणी जपण्यासाठी काही महिन्यांपूर्वी त्यांचं शिवाजी महाराज पार्कमध्ये स्मृती स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज 21 नोव्हेंबरला 6 फूट उंच स्मृती स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

रमाकांत आचरेकरांच्या या स्मृती स्मारकाचं भूमिपूजन त्यांच्या कन्या विशाखा आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवाजी महाराज पार्कच्या गेट क्रमांक 5 येथे रमाकांत आचरेकरांचं स्मती स्मारक उभारण्यात येत आहे. शिल्पकार तारकर हे रमाकांत आचरेकर याचं हे स्मृती स्मारक साकारणार आहेत. तारकर हे जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकलेले आहेत. या स्मृती स्मारकासाठी अंदाजे 30 लाख रुपये खर्च येणार आहे.

12 दिवसांनंतर स्मारकाचं उद्घाटन

रमाकांत आचरेकर यांच्या या स्मृती स्मारकाचं अवघ्या काही दिवसांमध्येच उद्धघाटनही होणार आहे. मिळाल्याने माहितीनुसार 3 डिसेंबरला या स्मारकाचे उदघाटन होणार आहे.

सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

दरम्यान राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाच्या स्मरणार्थ रमाकांत आचरेकर यांचं स्मृती स्मारक बांधण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकर याने आनंदी व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

‘ माझ्या आणि इतरांच्या आयुष्यावर आचरेकर सरांचा खूप मोठा प्रभाव आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे. आचरेकर सरांचं आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले. आचरेकर सरांची शिवाजी पार्कवर कायम राहणे हीच त्यांची इच्छा असेल. आचरेकर सरांच्या कर्मभूमीवर पुतळा उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे.’, असं ट्वीट सचिन तेंडुलकर याने केलं होतं.