मुंबई | टीम इंडियाचा डॅशिंग, माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने वर्ल्ड कप 2023 मध्ये पराक्रम केला. विराटने दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकलं. विराटने या शतकासह सचिनच्या वनडेतील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली. विराटने सचिनच्या तुलनेत वेगवान 49 शतकं पूर्ण केली. सचिनने 452 डावांमध्ये ही कामगिरी केली. तर विराटने केवळ 277 डावांच्या मदतीने हा कारनामा केला. विराटच्या या कामगिरीसाठी त्याचं सोशल मीडियावर कौतुक आणि अभिनंदन केलं जातंय. विराटच्या या कामगिरीसाठी त्याचं खुद्द सचिनने ट्विट करत अभिनंदन केलंय. विराटच्या या शतकामुळे सचिनचा आजपासून बरोबर 11 वर्षांआधीचा एक व्हीडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
सचिनने 2012 साली एका जाहीर कार्यक्रमात आपल्या रेकॉर्ड्सबाबत भविष्यवाणी केली होती. माझे विक्रम हे रोहित शर्मा आणि विराट कोहली हेच तोडतील, असं सचिनने म्हटलं होतं. विराटच्या 49 व्या शतकानंतर सचिनचा तो व्हीडिओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तसेच सचिनने 11 वर्षांआधी केलेली भविष्यवाणी कशी अचूक ठरली, हे नेटकरी सोशल मीडियावर सांगत आहेत. त्या व्हीडिओत नक्की काय आहे, सचिन आपले रेकॉर्ड्स ब्रेक होण्याबाबत काय म्हणाला होता हे आपण जाणून घेऊयात.
सचिनच्या 100 व्या आंतरराष्ट्रीय शतकानिमित्ताने एका जाहीर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. अभिनेता सलमान खान याने सचिनला कार्यक्रमात “तुझा रेकॉर्ड कोण मोडेल?”, असा प्रश्न केला होता. सचिनने या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं नाव घेतलं होतं. सचिनने वर्तवलेलं भाकीत आणि विराटवर दाखवलेला विश्वास किंग कोहलीने सार्थ ठरवलाय.
व्हायरल व्हीडिओ
दरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकावर 243 धावांनी दक्षिण आफ्रिकावर विजय मिळवला. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधील सलग आठवा विजय ठरला. आता टीम इंडिया वर्ल्ड कप साखळी फेरीतील अखेरचा सामना हा नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. विराटला या सामन्यातच वर्ल्ड कपचं औचित्य साधून सचिनच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.