Lata Mangeshkar : लता दीदी यांच्या आठवणीत सचिन तेंडुलकर भावूक, पोस्ट करत म्हणाला…

| Updated on: Feb 06, 2023 | 4:49 PM

भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करत दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Lata Mangeshkar : लता दीदी यांच्या आठवणीत सचिन तेंडुलकर भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Follow us on

मुंबई : भारतरत्न, गानकोकिळा, गाणसम्राज्ञी अशी अनेक विशेषणं कमी पडतील अशा लता मंगेशकर यांचा आज (6 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी. लता दीदींनी आजच्या दिवशी गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेल्या. दीर्घ उपचारानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला. लता दीदींच्या निधनाने कला विश्वासह संपूर्ण देशावरच शोककळा पसरली होती. काही दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला होता. दरम्यान आता लता दीदी यांच्या पहिल्या स्मृतीदिनी क्रिकेटचा देव भावूक झाला आहे.

टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लता दीदींच्या आठवणतीत भावूक झाला. सचिनने एक इमोशनल पोस्ट करत लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. सचिनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लता मंगेशकर आणि सचिन या दोघांचं आई-मुलासारखं नातं होतं. जेव्हा लता दीदी कायमच्या निघून गेल्या, तेव्हाही सचिन भावूक झाला होता.

हे सुद्धा वाचा

सचिनच्या पोस्टमध्ये काय?

सचिनने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लता दीदी यांच्या गाण्यातील काही ओळी शेअर केल्या आहेत. “तुम्हाला जाऊन एक वर्ष झालं लता दीदी, पण तुमची सावली कायम सोबतच राहिल”, असं ट्विट सचिनने केलं.

सचिनची भावूक पोस्ट

आई-लेकाचं नातं

लता दीदी आणि सचिन या दोघांमध्ये असलेलं नातं हे जगजाहीर होतं. या दोघांमध्ये रक्ताच्या पलीकडचं नातं होतं. सचिन लता दीदी यांना आई मानायचा. सचिनने याची कबूली एका जाहीर कार्यक्रमात दिली होती. तसेच सचिन चांगला खेळावा यासाठी लता दीदी या उपवास ठेवायच्या.

“सचिन मला आईसारखा समजतो. मी सुद्धा त्याच्यासाठी आईप्रमाणेच प्रार्थना करते. मी तो दिवस कधीही विसरु शकत नाही, जेव्हा सचिनने मला आई म्हणून हाक मारली होती. मी कल्पना सुद्ध करु शकत नाही. तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला सचिनसारखा मुलगा भेटला”, असं लता दीदी यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं होतं.

राज ठाकरे यांच्याकडून अभिवादन

दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही लता दीदी यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन केलं. राज यांनी ट्विट करत लता दीदी यांच्याबाबतची आपली भावना व्यक्त केली. “मूर्त स्वरुपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरुपातील दीदी कायम राहणार”, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.