भारतीय संघात स्थान मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं आता वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. कारण नवोदित खेळाडू आणि त्यांचा फॉर्म पाहता ही स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. असंच काहीसं साई सुदर्शनच्या बाबतीत म्हणता येईल. साई सुदर्शनला टीम इंडियाचं भविष्य मानलं जातं. त्याच्या फलंदाजीची शैली पाहून दिग्गज खेळाडू स्तुती करताना थकत नाहीत. आता याच साई सुदर्शनने इंग्लंडच्या भूमीवर आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. काउंटी चॅम्पियनशिपसाठी साई सुदर्शन सर्रे संघाकडून खेळतो. नॉटिंगघमशरविरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शने जबरदस्त खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 105 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे सहाव्या स्थानावर उतरत त्याने 178 चेंडूंचा सामना केला आणि शतक ठोकलं. त्याच्या या खेळीमुळे सर्रेला पहिल्या डावात 525 धावा करता आल्या.
साई सुदर्शनने आपल्या शतकी खेळीत 10 चौकार आणि षटकार मारला. यात षटकार ठोकत त्याने आपलं शतक साजरं केलं हे विशेष. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याचं हे चौथं शतक आहे. साई सुदर्शनचं काउंटी क्रिकेटमध्ये हा पहिला सामना होता आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलं. शतकी खेळी केल्यानंतर बाद झाला. पण सध्या फॉर्मात असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे. साई सुदर्शन टीम इंडियासाठी खेळला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली होती. साई सुदर्शनने दोन सामन्यात दोन अर्धशतकं ठोकली. त्याने 63.50 च्या सरासरीने 127 धावा केल्या. पण असं असूनही त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
A brilliant moment for Sai Sudharsan! 🫶💯
🤎 | #SurreyCricket https://t.co/rin3LLBhRR pic.twitter.com/76IvDxViih
— Surrey Cricket (@surreycricket) August 30, 2024
साई सुदर्शनची आयपीएल कारकिर्दही गाजली आहे. 2022 आयपीएलमध्ये त्याने पदार्पण केलं होतं. तीन आयपीएल स्पर्धांमध्ये साई सुदर्शन 25 सामने खेळला आहेत. यात त्याने एक शतक आणि 6 अर्धशतकांच्या जोरावर 1034 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट हा 139.17 चा राहिला आहे. मेगा लिलावात त्याला गुजरात टायटन्स रिलीज केलं तर साई सुदर्शनला मोठी रक्कम मिळू शकते. पण गुजरात सोडणार की रिटेन करणार हा देखील प्रश्न आहे.