मुंबई : संजू सॅमसन याने कायमच आपल्या आक्रमक खेळीने क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. आयपीएलमध्ये त्याने आपल्या खेळीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याची वर्णी भारतीय संघात लागावी यासाठी सोशल मीडियावर रान उठल्याचं पाहायला मिळालं आहे. पण अनेकदा संधी मिळूनही संजू सॅमसन हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली होती. मात्र संधीचं सोनं करण्यात त्याला यश आलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीबाबत आणि निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आता प्रशिक्षक राहुल द्रविड याने संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
“वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात बेंचवर बसलेल्या खेळाडूंची पारख करण्याची संधी होती.”, असं वक्तव्य राहुल द्रविड याने सामन्यानंतर केलं होतं. यातूनच त्याने सर्वकाही सांगितल्याचं दिसून येतं. या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे.
भारताला कोणत्याही परिस्थितीत विंडीड विरुद्ध मालिका जिंकायची आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत निवड होण्याचं स्वप्नही धुळीस मिळताना दिसत आहे. संजू सॅमसन वनडे मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतही टीम इंडियाचा भाग आहे.
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहेत. उपचारानंतर आता एसीएमध्ये हळूहळू ट्रॅकवर येत आहेत. आशिया कप स्पर्धेपूर्वी हे दोघंही फीट होतील असा अंदाज आहे. त्यामुळे संजू सॅमसनचं वनडे फॉर्मेटमधील पुनरागमन लवकर शक्य नसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
संजू सॅमसन याच्या प्रमाणे सूर्यकुमार यादव हा देखील काही खास करू शकलेला नाही. दोन्ही वनडे सामन्यात फेल गेला आहे. यापूर्वीही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तीन वेळा शून्यावर बाद झाला आहेत. पण असं असताना सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. टी20 स्पर्धेतील चांगल्या खेळीमुळे त्याला आणखी एक संधी मिळेल. सूर्यकुमार की संजू सॅमसन असा प्रश्न आला तर सूर्यकुमारची निवड केली जाऊ शकते. त्यामुळे संजू सॅमसन वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसला नाही तर आश्चर्य वाटायला नको.