Sara Tendulkar : “…. हे सांगताना मला आनंद”, साराचा फोटो पोस्ट करत सचिनची मोठी घोषणा

| Updated on: Dec 04, 2024 | 2:18 PM

Sara Sachin Tendulkar : टीम इंडियाचा माजी आणि दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने तिची लेक सारा तेंडुलकर हीच्याबाबत सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे.

Sara Tendulkar : .... हे सांगताना मला आनंद, साराचा फोटो पोस्ट करत सचिनची मोठी घोषणा
Sara Sachin Tendulkar
Image Credit source: Sachin Tendulkar X Account
Follow us on

टीम इंडियाचा माजी आणि दिग्ग्ज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने मंगळवारी 3 डिसेंबर 2024 रोजी राज ठाकरे यांच्यासह महान प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण केलं. आचरेकर सरांच्या जंयतीनिमित्ताने दादरमधील शिवाजी महाराज पार्कातील गेट क्रमांक 5 येथे हे स्मारक उभारण्यात आलं. सचिनने यानंतर सरांबाबतच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित क्रिकेट चाहत्यांशी संवाद साधला. त्यानतंर अवघ्या काही तासांनंतर सचिनने 4 डिसेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. सचिनने त्याची लेक सारा तेंडुलकर हीचे एक्स अकाउंटवरुन 3 फोटो पोस्ट केलेत. सचिनने यासह मोठी घोषणा केली आहे.

सचिनची एक्स पोस्ट

सचिनने सारावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. दिग्गज क्रिकेटरने साराची सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये संचालक म्हणून रुजु झाल्याचं जाहीर केलं आहे. “माझी मुलगी सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर फाउंडेशनसह अधिकृतरित्या जोडली गेली असून ती संचालक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे”, असं सचिनने एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“साराने लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. साराने क्रीडा, आरोग्यसेवा आणि शिक्षण याद्वारे भारताला सक्षम बनवण्याच्या या प्रवासाला सुरुवात केली असताना, जागतिक शिक्षण कसे पूर्ण होऊ शकते याची आठवण करून देणारे आहे”, असंही सचिनने या एक्स पोस्टमध्ये नमूद केलंय.

सचिन तेंडुलकर फाउंडेशन

सचिन तेंडुलकर फाउंडेशन अंतर्गत 2019 पासून देशातील विविध भागांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि अन्य क्षेत्रात काम केलं जातं. सारा आणि तेंडुलकर कुटुंबिय हे सातत्याने सचिन तेंडुलकर फाउंडेशनसाठी काम करत असतात. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनकडून सिहोर जिल्ह्यातील पाच केंद्र दत्तक घेण्यात आली आहेत. त्यानुसार नयापुरा, खापा, बेलपाटी, जामुनझील आणि सेवानिया ही 5 केंद्र दत्त घेण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये 3 ते 15 या वयोगटातील मुलांना शिक्षण आणि मोफत जेवण दिलं जातं.

सचिनची एक्स पोस्ट

सारा आणि अंजली तेंडुलकर या दोघांनी काही महिन्यांपूर्वी जामुनझिल आणि सेवानिया या सचिन तेंडुलकर फाउंडशेनअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या केंद्राला भेट दिली होती. तेव्हा सारा आणि अंजली तेंडुलकर या दोघींनी त्या केंद्रातील मुलांसह वेळ घालवला होता. साराने या भेटीनंतर सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत तिचे आजोबा साहित्यिक आणि प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचा वारसा असाच पुढे सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं होतं.

सारा चालवणार आजोबांचा वारसा

“मला माझ्या जीवनातील पहिलंच वर्ष आजोबांसह घालवता आलं. मात्र मला त्यांची शिक्षणाप्रती असलेली ओढ माहितीय. मी त्यांच्याबाबत ऐकत मोठी झालीय. शिक्षणामुळे अनेक संधी उपलब्ध होतात. शिक्षणात अनेक संधी उपलब्ध करुन देण्याची शक्ती आहे. माझ्या आजोबांना शिक्षणाबाबतच्या या वाक्याचा नेमका अर्थ मला या केंद्राला भेट दिल्यानंतर उमगला”, असं साराने तेव्हा म्हटलं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. आता सारा आजोबांचा वारसा या फाउंडेशनच्या माध्यमातून चालवत आहे. साराला तिच्या या नव्या प्रवासासाठी नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.