अजिंक्य रहाणेला मिळणार सरफराज खानची साथ? बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत असे पडणार फासे

| Updated on: Sep 24, 2024 | 5:44 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटला अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे अंतिम फेरीचं गणित सोडवण्यासाठी संघांची आकडेमोड सुरु आहे. दिग्गज संघांना कसोटीत ताक फुंकून पिण्याची वेळ आली आहे. बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. दुसऱ्या सामन्यात सरफराज खानला संधी मिळेल की नाही? अशी चर्चा सुरु असताना एक बातमी समोर आली आहे.

अजिंक्य रहाणेला मिळणार सरफराज खानची साथ? बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत असे पडणार फासे
Follow us on

भारत आणि बांग्लादेश यांच्यात 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात फार काही बदल होणार नाही. जास्तीत एखाद वेगवान गोलंदाज कमी करून फिरकीपटूला संधी मिळेल. त्यामुळे सरफराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशी सर्व परिस्थिती पाहता बीसीसीआय मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानला रिलीज करण्याची शक्यता आहे. कारण इराणी चषकासाठी 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया असा सामना होणार आहे. प्लेइंग 11 घोषित होताच सरफराजला रिलीज केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत कोणी जखमी झालं नाही तर सरफराजला रिलीज केलं जाईल. त्यामुळे सरफराज खान त्यानंतर लगेचच मुंबईच्या ताफ्यात रुजू होईल. इराणी चषकात मुशीर खान आणि पृथ्वी शॉ ओपनिंगला येतील असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात सांगितलं आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा निवड समिती अध्यक्ष शेवटच्या क्षणापर्यंत सरफराजला थांबवून ठेवतील.नेट प्रॅक्टिसमध्ये एखाद्याला दुखापत किंवा फिटनेस निगडीत समस्या उद्भवली तर त्याला संधी मिळू शकते. इराणी चषकासाठी सरफराजला कानपूरहून लखनौला जावं लागणार आहे. दुसरा कसोटी सामना सुरु होताच सरफराज तासाभरातच लखनौसाठी रवाना होईल, असं बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबईने इराणी चषकासाठी संघाची घोषणा केली आहे. तुषार देशपांडे दुखापतीमुळे इराणी चषकाला मुकला आहे. नुकतीच त्याच्या घोटा आणि गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. “देशपांडे पुढील काही महिन्यांसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेऱ्यांनाही मुकणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी लवकरात लवकर परत येईल,” असे सूत्रांनी सांगितलं आहे.

सरफराज खानला कसोटी संघात पदार्पणसाठी आणखी सामने वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, सरफराजने 50 प्रथम श्रेणी सामन्यात 14 शतकं आणि अर्धशतकांच्या जोरावर 4183 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची फलंदाजीची सरासरी 66.39 इतकी आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली ठेवली तर त्याला नक्कीच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकतं. पुढच्या महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

इराणी कपसाठी मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ , आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धांत अधातराव, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रॉयस्टन डायस.