मुंबई | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीमसाठी खोऱ्याने धावा केल्या. निर्णायक सामन्यात एकाकी भिडला आणि टीमला जिंकवलं. जे टीमला गेल्या अनेक वर्षात जमलं नाही, ते त्याने आपल्या नेतृत्वात केलं. या खेळाडूने आपल्या नेतृत्वात 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या टीमला पराभवाची धुळ चारली. क्रिकेटमधील 15 वर्षांच्या कारकीर्दीत वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीसह टीमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. अखेर या माजी कर्णधार राहिलेल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. माजी कर्णधाराने घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. क्रिकेट चाहत्यांना या निर्णयावर विश्वास बसत नाहीये.
क्रिकेट विश्वात बॅटिंगच्या जोरावर नाव कमावणारा स्कॉटलँडचा माजी कर्णधार काईल कोएत्जर याने क्रिकेटला अलविदा केलाय. यासह काईलचं 15 वर्षाची क्रिकेट कारकीर्द ठरली. काईलने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तसेच निवृत्तीनंतर भविष्यात काय करणार याबाबतही घोषणा केलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘हिट विकेट’ झाल्यानंतर कोएत्जर हा स्कॉटलँड क्रिकेट टीममध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
“मला नाही वाटत की निवृत्ती घेण्यासाठी कोणती योग्य वेळ असते. मी गेल्या काही वेळेपासून स्वत:साठी नव्या संधीच्या शोधात होतो. जेव्हा समोरुन संधी चालून आली तेव्हा मी ती नाकारु शकलो नाही. मला माझ्या कारकीर्दीबाबत अभिमान आहे. तसेच कर्णधार म्हणून मी टीमसाठी जे काही केलं ते माझ्यासोबतच असणार आहे”, असं कोएत्जर सोशल मीडियावर निवृ्त्ती जाीर करताना म्हणाला.
कोएत्जरच्या नेतृत्वात स्कॉटलँडने धमाकेदार कामगिरी केली होती. स्कॉटलँड टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी क्वालिफाय केलं होतं. इतकंच नाही, तर स्कॉटलँडने कोएत्जरच्या कॅप्टन्सीत 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या विंडिजचा 42 धावांनी धुव्वा उडवला होता. तसेच कोएत्जरच्या कॅप्टन्सीत 2021 मध्ये सुपर 12 मध्ये प्रवेश केला होता.
कोएत्जर आपल्या देशासाठी सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज आहे. कोएत्जरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 89 सामन्यात सर्वाधिक 3 हजार 192 धावा केल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये 70 सामन्यात 1 हजार 495 रन्स केल्या आहेत. तर 94 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4 हजार 404 धावा केल्या. तसेच लिस्ट ए क्रिकेटमधील 199 मॅचमध्ये त्याने 6 हजार 296 रन्स काढल्या आहेत.