मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 फेरीतील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आता हा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. सामना रद्द झाल्यानंतर मैदानात जसप्रीत बुमराह आणि शाहिन शाह आफ्रिदी यांची भेट झाली. जसप्रीत बुमराह वडील झाल्याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी शाहिन शाह आफ्रिदी आला होता. इतकंच काय तर यावेळी त्याने जसप्रीत बुमराह याला भेटवस्तू दिली. यावेळी शाहीनने त्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या. जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना 4 सप्टेंबर रोजी पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. तसेच मुलाचं नाव अंगद असं ठेवलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवर आफ्रिदी आणि बुमराह यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. “भावा, खूप खूप शुभेच्छा, लहान बाळासाठी छोटसं गिफ्ट, देव त्याला खूश ठेवेल आणि नवीन बुमराह बनेल.” अशा शुभेच्छा शाहीन शाह आफ्रिदीने जसप्रीत बुमराह याला दिल्या.
Spreading joy 🙌
Shaheen Afridi delivers smiles to new dad Jasprit Bumrah 👶🏼🎁#PAKvIND | #AsiaCup2023 pic.twitter.com/Nx04tdegjX
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 10, 2023
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने वर्षभराच्या कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानच्या विरुद्धच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी करता आली नाही. त्यानंतर नेपाळ विरुद्धच्या सामन्यात बाळाच्या जन्मामुळे खेळला नाही. त्यानंतर आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळत आहे. मात्र हा सामना पावसामुळे होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची धार पाहण्याची अनुभूती मिळेल की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 24.1 षटकात दोन गडी गमवून 147 धावा केल्या. रोहित शर्मा याने 49 चेंडूत 56, तर शुबमन गिल याने 52 चेंडूत 58 धावा केल्या. मैदानात विराट कोहली नाबाद 8 आणि केएल राहुल नाबाद 17 धावांवर खेळत आहेत. राखीव दिवशीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.