Video : टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान शाहीन आफ्रिदी गेला इतक्या खालच्या थराला, गॅरी कर्स्टनने केली पोलखोल

| Updated on: Jul 10, 2024 | 9:04 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघातील दुफळी समोर आली आहे. त्याचा फटका स्पर्धेत बसल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी मीडियाने दावा केला आहे की, वनडे आणि टी20 टीमचे हेड कोच गॅरी कर्स्टनने शाहीन आफ्रिदीची तक्रार पीसीबीकडे केली आहे. शाहीनवर कोच आणि टीम मॅनेजमेंटशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

Video : टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान शाहीन आफ्रिदी गेला इतक्या खालच्या थराला, गॅरी कर्स्टनने केली पोलखोल
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली. साखळी फेरीतूनच आव्हान संपुष्टात आल्याने नाचक्की झाली आहे. पाकिस्तान संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. इतकंच काय तर अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने क्रीडाप्रेमी नाराज आहेत. असं असताना या स्पर्धेत पाकिस्तानी संघात दोन गट पडल्याचं जगजाहीर झालं आहे. आता या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनेल समा टीव्हीने दावा केला आहे की, वनडे आणि टी20 संघाचे हेड कोच गॅरी कर्स्टन यांनी पीसीबी अध्यक्षांना भेटून संघातील गटातटाबाबत सांगितलं होतं. इतकंच काय तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याचीही तक्रार केली होती. कोच आणि सपोर्ट स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचं त्यांनी या भेटीत सांगिलं होतं. याबाबत हेड कोच गॅरी कर्स्टन आणि असिस्टंट कोच अझहर महमूद यांनी याची तक्रार टीम मॅनेजरकडे केली होती. मात्र त्याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.

समा टीव्हीच्या मते, टीम मॅनेजमेंटमध्ये असलेल्या वहाब रियाजने शाहीनला काहीच बोललं नाही. इतकंच काय तर शाहीन आफ्रिदी इतर खेळाडूंविरोधात कट कारस्थान रचत असल्याचंही सांगितलं होतं. मात्र तक्रारीनंतरही जैसे थेच होतं. आता वहाबची पाकिस्तान टीम मॅनेजमेंटमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकीकडे शाहीन आफ्रिदीबाबत बरंच काही समोर येत असताना दुसरीकडे, त्याचा सासरा शाहीद आफ्रिदी बाबर आझमवर टीका करत सुटला आहे.

शाहीद आफ्रिदीने सांगितलं की, “बाबर आझमला कर्णधार म्हणून बरीच संधी मिळाली आहे. आता पीसीबी दुसरं कोणाची तर कर्णधार म्हणून निवड करणार असेल तर त्याला संधी मिळाली पाहीजे.” शाहीन आफ्रिदी टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार होता. मात्र वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याच्याकडील जबाबदारी बाबर आझमकडे सोपवण्यात आली. त्यानंतर शाहीद आफ्रिदीने आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच ही जबाबदारी बाबरने पुन्हा घेण्याची गरज नव्हती असं देखील सांगितलं होतं. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान संघात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.