“शाहरुख, सलमान आणि आमिर एकत्र असले तरी चित्रपट हिट होईल याची गॅरंटी नाही”, सेहवागचं मुंबई इंडियन्सवर थेट भाष्य

| Updated on: May 17, 2024 | 4:36 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत स्टार खेळाडू असूनही मुंबई इंडियन्सने सर्वात खराब कामगिरी केली आहे. गुणतालिकेत सर्वात शेवटी असून शेवटचा सामना जिंकूनही वर येण्याची संधी नाही. त्यामुळे चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्याता आता माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने परखड मत व्यक्त केलं आहे.

शाहरुख, सलमान आणि आमिर एकत्र असले तरी चित्रपट हिट होईल याची गॅरंटी नाही, सेहवागचं मुंबई इंडियन्सवर थेट भाष्य
Follow us on

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने मुंबई इंडियन्स व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. बॉलिवूड चित्रपटाचं उदाहरण देत कानउघडणी केली आहे. इतकंच काय तर आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी स्टार खेळाडूंना रिलीज करण्याचा सल्लाही दिला आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये 13 पैकी फक्त चार सामने जिंकल्यानंतर वीरेंद्र सेहवागने हे मत व्यक्त केलं आहे. या पर्वापूर्वी हार्दिक पांड्याने रोहित शर्माकडून कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. मात्र परिस्थिती काही बदलली नाही. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी क्रिकबझशी बोलताना सेहवागने स्टार पॉवरपेक्षा कामगिरीवर जोर देण्यासाठी बॉलिवूडची उपमा वापरली. “शाहरूख , सलमान आणि आमिर खान एकत्र आले तरी चित्रपट हीट होईल याची कोणी खात्री देत नाही. कारण त्यांना चांगलं परफॉर्म करावं लागेल. तुम्हाला चांगली स्क्रिप्ट हवी. असंच मोठ्या नावांबाबत असता. रोहित शर्माने शतक ठोकलं पण बाकीच्यांची कामगिरी कुठे होती? सामना गमवावा लागला.”, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

“ईशान किशन संपूर्ण सिझनमध्ये खेळला. पण पॉवर प्लेच्या पलीकडे टिकू शकला नाही. मुंबई इंडियन्ससाठी मला तरी पुढे दोनच नाव निश्चित वाटत आहेत. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना कायम ठेवलं पाहीजे. रिटेनसाठी ही दोन नावं टॉपला असतील. जर यांच्यापैकी एकाला रिलीज केलं तर मग तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनचा पर्याय असेल.”, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. इतकंच काय तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि इशान किशनला रिलीज करण्याचा सल्लाही त्याने दिला.

माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यानेही सेहवागच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. मुंबई इंडियन्सने पुढच्या पर्वात बुमराह आणि सूर्यकुमारला रिटेन करावं. इतकंच काय तर या दोघांपैकी एकाला कर्णधारपद सोपवावं. जर विदेशी खेळाडू रिटेन करण्याची वेळ आली तर मग टिम डेविडला प्राधान्य द्यावं असंही मनोज तिवारीने सांगितलं.

मुंबई इंडियन्स संघ: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, नमन धीर, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, हार्विक देसाई, जेराल्ड कोएत्झी, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, क्वेना मफाका.