टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. यासाठी 20 संघ स्पर्धेत असून जेतेपदासाठी महिनाभर लढत असणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध असणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने 30 एप्रिलला संघाची घोषणा केली होती. आयपीएल स्पर्धेचा मध्यान्ह्य झाला असताना टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 15 खेळाडूंची निवड केली गेली. तसेच हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवलं गेलं. मात्र संघाची घोषणा झाल्यानंतर काही खेळाडूंच्या कामगिरीला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. काही खेळाडूंनी फॉर्म गमवला, तर काही खेळाडू पुन्हा एकदा फॉर्मात आले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चमकदार कामगिरी केलेल्या शिवम दुबेबाबत असंच काहीसं झालं आहे. शिवम दुबेने पहिल्या टप्प्यात धडाकेबाज कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असंच म्हणावं लागेल. शिवम दुबेने या पर्वातील पहिल्या टप्प्यातील 9 सामन्यात 172.4 च्या स्ट्राइक रेटने 350 धावा केल्या होत्या. यात 26 षटकार ठोकले होते. मात्र शिवम दुबेने शेवटच्या 5 सामन्यात फक्त 2 षटकार मारले आहेत.
शिवम दुबेची अष्टपैलू म्हणून संघात निवड केली आहे. मात्र त्याला या पर्वात संघाने गोलंदाजीही दिली नाही. त्यामुळे त्याची दुसरी बाजू पारखण्याची संधी मिळाली नाही. अष्टपैलू शिवम दुसऱ्या टप्प्यात फिरकीच्या जाळ्यात अडकल्याचं दिसून आलं. आरसीबीविरुद्धच्या हायप्रेशर सामन्यात शिवम दुबेकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र या महत्त्वाच्या सामन्यात 15 चेंडूत फक्त 7 धावा करून बाद झाला. त्यामुळे शिवम दुबेच्या निवडीवर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शिवम दुबे आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव सहन करू शकेल का असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाला संघात बदल करण्यासाठी 25 मेपर्यंतचा अवधी आहे. पण संघात ऐनवेळी बदल करण्याची शक्यता कमीच आहे. पण बदल करण्याची वेळच आली तर रिंकू सिंहला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण दिसत आहे. रोहित शर्मा त्याच्या ऐवजी हार्दिकलाच संधी देईल.
टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यास्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीतदीप सिंग, बुमराह, मोहम्मद सिराज.राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.