मुंबई : आज उद्या करता करता बीसीसीआयने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चार दिवस आधी संघाची घोषणा केली आहे. या संघातून दोन गोष्टी प्रामुख्याने अधोरेखित होत आहेत. एक तर विराट कोहली या संपूर्ण कसोटी सामन्यात खेळणार नाही. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरं, श्रेयस अय्यर उर्वरित तीन सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. श्रेयस अय्यरला संघात स्थान न देण्याचं कारण बीसीसीआयने स्पष्ट केलेलं नाही. पण संघ निवडीपूर्वी त्याने फॉरवर्ड डिफेन्स शॉट्स खेळताना पाठिची दुखापत जाणवत असल्याचं सांगितलं होतं. शस्त्रक्रियेनंतर श्रेयसला पहिल्यांदाच अशा समस्येला समोरं जावं लागलं आहे. त्यामुळे त्या काही आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पण बीसीसीआयने अय्यरच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अय्यरला नेमकं कोणत्या कारणासाठी वगळण्यात आलं याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दुखापतीमुळे की खराब फॉर्ममुळे डच्चू दिला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी निराशाजनक राहिली. हैदराबाद कसोटी भारताला 28 धावांनी गमवावी लागली होती. या सामन्याच्या दोन डावात 35 आणि 13 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण भ्रमनिरास झाला. विशाखापट्टणममध्येही अय्यर मोठी खेळी करण्यात अपयशी टरला होता. पहिल्या डावात 27 धावा आणि दुसऱ्या डावात 29 धावांची खेळी केली होती. यावेळी फिरकीपटूंसमोर अय्यर संघर्ष करताना दिसला.
श्रेयस अय्यर मागच्या दोन वर्षांपासून कसोटी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. या वर्षीही खेळलेल्या तीन कसोटी सामन्यात त्याने 21.60 च्या सरासरीने धावा केल्या. तर 2023 मध्ये चार कसोटीत 13.16 च्या सरासरीने धावा केल्या. त्यामुळे श्रेयस अय्यरची जागा सरफराज खान घेण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खानला संधी मिळू शकते.
संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.