मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसरकर मालिका आता संपली आहे. भारताने 2-1 ने ही मालिका खिशात घालत कांगारूंचा पराभव केला होता. या कसोटी मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडे मालिका येत्या 17 तारखेपासून सुरू होत आहे. या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसापासूनच भारतीय संघासह-संघव्यस्थापनाला जी भाती होती तेच घडलं आहे. भारताचे फिल्डिंग कोच यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर दुखातपतीमुळे वनडे मालिकेमधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये श्रेयस नसणार आहे. याबाबत भारताचे फिल्डिंग कोच दिलीप यांनी जाहीरपणे सांगितल्याची माहिती समजत आहे. टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील खेळाडू श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळेस त्रस्त आहे. कसोटी मालिकेमध्ये अय्यरने फिट होत पुनरागमन केलं होतं मात्र त्याला बॅटींगमध्ये फारशी चमक दाखवता आली नव्हती.
जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णाप्रमाणे शस्त्रक्रिया करावी लागेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. दुखापत हा खेळाचा एक भाग असून आमच्याकडे उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आहेत. त्याच्या दुखापतीकडे आमचं लक्ष असून त्याच्या संपर्कात राहणार असल्याचंही दिलीप यांनी सांगितल्याचं समजत आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेलाही श्रेयस अय्यर मुकण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचं तो कर्णधारपद सांभाळत आहे. त्यामुळे दुखापतीतून सावरला नाहीतर केकेआर संघासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, आयपीएलचा आगामी हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. कोलकाता संघाने दोनवेळा विजेतेपद पटकावलं आहे. अय्यर दुखापतीतून सावरला नाहीतर संघाला नवीन कर्णधार पाहावा लागणार आहे.