शुबमन गिलने कसोटी क्रिकेटबाबत जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, म्हणाला…

| Updated on: Sep 04, 2024 | 6:29 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबर रोजी कसोटी मालिका सुरु होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडू देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याने कसोटी क्रिकेटबाबत एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची आता क्रिकेटविश्वात चर्चा सुरु झाली आहे.

शुबमन गिलने कसोटी क्रिकेटबाबत जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, म्हणाला...
Follow us on

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत घाम गाळणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना पार पडला की दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला जाईल. त्यानंतर 12 सप्टेंबरला प्रशिक्षणासाठी निवडलेला संघ चेन्नईच्या चेपॉक मैदानावर एकत्र येईल. असं असताना भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटपटू शुबमन गिलच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुबमन गिलने कसोटी मालिकेपूर्वी जाहीर कबुली दिली की, कसोटी करिअर अपेक्षेप्रमाणे झालेलं नाही. शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध देशात झालेल्या मालिकेत 500 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा त्याचा सर्वोत्तम स्कोअर राहिला आहे. आता 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या दुलीप ट्रॉफी टीम इंडिया ए संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. यावेळी त्याने कसोटी क्रिकेट करिअरबाबत आपलं मत स्पष्ट केलं.

‘कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. पण आम्हाला या सत्रात एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. या सामन्यानंतर मी जेव्हा मागे वळून पाहीन तेव्हा माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या असतील अशी आशा करतो.’, असं शुबमन गिलने सांगितलं. ‘मी फिरकीपटूंविरोधात बचावात्मक खेळण्यासाठी अधिक काम केलं आहे. जेव्हा फिरकीपटूंविरोधात टर्निंग विकेटवर खेळत असतो तेव्हा बचावात्मक असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही फटकेबाजी करत धावा करू शकता.’ असं शुबमन गिल पुढे म्हणाला. “आता जास्तीत जास्त प्रमाणात टी20 क्रिकेट खेळलं जात आहे. पाटा विकेट किंवा फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर डिफेंसिव्ह खेळ कमी होतो. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत माझं लक्ष यावरच असेल.”, असंही गिल पुढे म्हणाला.

भारत आणि गुजरात टायटन्स कर्णधारपदाचा संदर्भ देत गिलने सांगितलं की, ‘प्रत्येक सामन्यातून स्पर्धेतून तु्म्हाला काहीतरी धडा घ्यायचा असतो. मग तुम्ही कर्णधार असाल किंवा नसाल. कर्णधार असताना तुम्हाला इतर खेळाडूंची माहिती मिळते. त्यामुळे कर्णधाराने खेळाडूंशी संपर्क साधणं महत्त्वाचं ठरतं. तुम्हाला त्यांची ताकद आणि कमकुवतपणा कळायला हवा. माझ्यातही काही बदल झाले आहेत. कारण कर्णधार किंवा उपकर्णधार असता तेव्हा तुम्हाला तुमच्या खेळाडूंशी बोलावं लागतं.’