टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत खऱ्या अर्थाने भारताने लगान वसूल केला आहे. 2022 वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताने 171 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडचा संपूर्ण संघ 103 धावांवर बाद झाला आणि भारताने 68 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता भारताचा अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे. असं असताना इंग्लंडला लोळवल्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंगने एक ट्वीट केलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून युवराज सिंगने इंग्लंड संघाला डिवचलं आहे. तसेच भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज सिंगने अधिकृत एक्स अकाउंटवरून एक ट्वीट केलं आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, “भारतीय खेळाडूंनी खरंच खूप छान खेळलं. शुभ रात्री सासरच्यानों” असं ट्वीट केलं तसेच हसणारा इमोजी टाकला आहे.
युवराज सिंगचं हे ट्वीट क्रीडारसिकांना खूपच भावलं आहे. कारण या ट्वीटचा अर्थ त्याच्या चाहत्यांना बरोबर कळला आहे. युवराज सिंगची पत्नी हेजल कीच ही ब्रिटीश नागरिक आहे. युवराज सिंगसाठी इंग्लंड संघ सासर झालं. त्यामुळे इंग्लंडला ट्रोल करण्याचा त्याचा अंदाज क्रीडाप्रेमींना खूप आवडला आहे. दुसरीकडे, हेजल कीचला क्रिकेटमधलं काही कळत नाही. रिअॅलिटी शोमध्ये हे जोडपं आलं होतं तेव्हा ती युवराजच्या खेळाबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे या ट्वीटखाली नेटकऱ्यांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Well played boys 🇮🇳 goodnight in-laws 🤪 #IndiaVsEng #ICCMensT20WorldCup2024
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 27, 2024
दरम्यान, युवराज सिंग टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच 2007 मध्ये वर्ल्डकप जिंकवण्यात त्याचा मोलाचा हात होता. याच स्पर्धेत इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात युवराज सिंगने सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. युवराज सिंग समोर स्टूअर्ट ब्रॉड ओव्हर टाकत असताना त्याने हा कारनामा केला. त्यानंतर युवराज सिंगला सिक्सर किंग म्हणून नाव पडलं. 2007 नंतर टीम इंडियाला पुन्हा एकदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी चालून आली आहे. टीम इंडियाचा अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे.