कोलंबो | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका क्रिकेट टीमचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. अफगाणिस्तानने या विजयासह विजयी सलामी दिली आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानने हे आव्हान 19 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अफगाणिस्तानने 46.5 ओव्हरमध्ये 4 बाद 269 धावा केल्या. अफगाणिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघा़ी घेतली आहे.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या मालिकेत आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यांमधील प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आहेत. अफगाणिस्तानच्या गोटात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळणारा राशिद खान तर श्रीलंकेच्या गोटात मथीशा पथिराणा. त्यामुळे राशिदच्या अफगाणिस्तानने चेन्नईकडून खेळणाऱ्या मथीशा पथीराणा याच्या श्रीलंकेचा धुव्वा उडवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
A brilliant performance by Afghanistan ?
They take a 1-0 series lead after winning the first ODI in Hambantota!#SLvAFG | ?: https://t.co/o3emek1vuz pic.twitter.com/UDYGPAEFVD
— ICC (@ICC) June 2, 2023
अफगाणिस्तानकडून इब्राहिम झरदान याने सर्वाधिक धावा केल्या. इब्राहिम याचं अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं. इब्राहिमने 98 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 98 धावांची खेळी केली. रहमत शाह याने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने 38 धावांचं योगदान दिलं. रहमानुल्लाह गुरुबाज 14 धावा करुन माघारी परतला. तर मोहम्मद नबी आणि नजिबुल्लाह झरदान या जोडीने अफगाणिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं.
नबीने नाबाद 27 आणि नजिबुल्लाह याने नाबाद 7 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसून राजिथा याने सर्वाधिक 2 फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवलं. लहिरुने एक विकेट घेतली. तर मथीशा पथिराना याने रहमत शाह याला आऊट करत डेब्यू सामन्यातच पहिलीवहिली विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेच्या असलांकाने 91 धावा केल्या. असलांका 91 धावांवर रनआऊट झाला. असलांका नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. धनंजया डी सीलव्हा याने 51 धावा केल्या. इतर फलंदाजांना सुरुवात मिळाली. मात्र त्याआधीच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखलं.
अफगाणिस्तानकडून फरीद अहमद आणि फझलहक फारुकी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अजमतुल्लाह, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नबी या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान या मलिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा 4 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (wk), अँजेलो मॅथ्यूज, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, कसून राजिथा, मथीशा पाथिराना आणि लाहिरु कुमारा.