दांबुला | श्रीलंका क्रिकेट टीमने दुसऱ्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तानवर 72 धावांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेने या विजयासह मालिकाही जिंकली. श्रीलंकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा कार्यक्रम केला. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव 17 ओव्हरमध्ये 115 धावांवर आटोपला. अनुभवी अँजलो मॅथ्यूज हा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला.
अफगाणिस्तानची 188 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. श्रीलंकेने अफगाणिस्तानला सुरुवातीपासून झटके देत अखेर ऑलआऊटच करुन गेम ओव्हर केला. अफगाणिस्तानकडून करीम जनात याने 28 आणि मोहम्मद नबी याने 27 धावांचं योगदान दिलं. तर रहमानुल्लाह गुरुबाज याने 13 आणि कॅप्टन इब्राहीम झद्रान याने 10 धावा केल्या. नूर अहमद 5 धावांवर नाबाद परतला. तर इतरांना काहीच करता आलं नाही. श्रीलंकेकडून अँजलो मॅथ्यूज याने 2 ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर बिनुरा फर्नांडो, कॅप्टन वानिंदू हसरंगा आणि मथीथा पथिराणा या तिघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या. तर महीश तीक्षणा आणि दासुन शनाका या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेची आश्वासक सुरुवातीनंतर डाव गडगडला. मात्र त्यानंतर सदीरा समरविक्रमा आणि अँजलो मॅथ्यूज या दोघांनी अखेरपर्यंत सहाव्या विकेटसाठी 66 धावांची निर्णायक भागीदारी केली. सदीरा अखेरच्या बॉलवर 51 धावांवर आऊट झाला. अँजलोने 22 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 42 धावा केल्या. तर वानिंदू हसरंगा याने 22, कुसल मेंडीस 23 आणि पाथुम निसांका याने 25 धावा केल्या. तर अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह आणि मोहम्मद नबी या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. नवीन उल हक आणि फझलहक फारुकीच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
श्रीलंका टीमचा दणदणीत विजय
A dominant performance secures a MASSIVE 72-run win against Afghanistan, clinching the series with one match to go! 🎉 🇱🇰 #SLvAFG pic.twitter.com/GQUVx4lRqE
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 19, 2024
दरम्यान उभयसंघात मालिकेतील तिसरा आणि आणि अखेरचा सामना हा 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अफगाणिस्तानचा हा सामना जिंकून क्लीन स्वीप रोखण्याचा आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | वानिंदू हसरंगा (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, बिनुरा फर्नांडो आणि मथीशा पाथिराना.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला ओमरझाई, हजरतुल्ला झझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फझलहक फारुकी.