टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 7 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत राहिला होता. तर श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर मात करत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे श्रीलंकेकडे मालिका विजयाची संधी आहे. तर भारतासाठी अटीतटीचा सामना आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील आकडेवारी जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 170 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या 170 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारताने सर्वाधिक 99 सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आहे. भारताने 99 पैकी 40 सामने हे मायदेशात जिंकले आहेत. 32 सामने श्रीलंकेत तर 27 सामने हे त्रयस्थ ठिकाणी जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 58 सामन्यांमध्ये टीम इंडियावर मात केली आहे. तसेच उभयसंघात झालेल्या 11 एकदिवसीय सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर 2 सामने बरोबरीत सुटले.
एकूणच उभयसंघातील आकडे पाहता टीम इंडियाच श्रीलंकेवर वरचढ आहे. मात्र टीम इंडियाला या मालिकेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता आकडेवारीनुसार वरचढ असलेल्या टीम इंडियाला श्रीलंके विरुद्ध विजय मिळवून शेवट गोड करता येईल का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, खलील अहमद, रियान पराग आण हर्षित राणा.
एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : चरिथ असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेलालगे, कामिंदू मेंडिस, अकिला दानंजया, जेफ्री वांडरसे, असिथा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, निशान मदुशंका, महीश तीक्षाना, एशान मलिंगा आणि मोहम्मद शिराज.