टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील पहिल्याच टी 20I मालिकेत श्रीलंकेवर 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप करत शानदार विजय मिळवला. त्यानंतर सूर्यकुमारच्या नेतृत्वाची एकट चर्चा पाहायला मिळलत आहे. श्रीलंकेला तिसऱ्या सामन्यात विजयासाठी मिळालेल्या 138 धावांचा पाठलाग करताना 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे सामना टाय झाला. श्रीलंकेला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विजयसाठी 9 धावांची गरज होती. तेव्हा सूर्याने रिंकू सिंह याला बॉलिंग दिल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. मात्र रिंकूने 3 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेत श्रीलंकेला पराभवाच्या दिशने ढकललं. रिंकूने या कामगिरीसह कॅप्टन सूर्याने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे श्रीलंकेसाठी तिसरा आणि शेवटचा सामना हा प्रतिष्ठेचा होता. लंकेच्या गोलंदाजांनी भारताला 137 धावांपर्यंतच पोहचू दिल्याने 138 धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकेच्या बाजूने 18 व्या ओव्हरपर्यंत सर्वकाही व्यवस्थित होतं. मात्र रिंकूने 19 वी ओव्हर टाकू सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. लंकेला विजयासाठी आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावांची गरज होती. कॅप्टन सूर्याने ही शेवटची ओव्हर टाकली. सूर्यानेही त्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सूर्याने टीममध्ये मोहम्मद सिराज आणि इतर अनुभवी गोलंदाज असतानाही 19 वी ओव्हर रिंकूला दिल्याने अनेकांना झटका लागला. सूर्याने असं का केलं? याबाबत त्याला सामन्यानंतर विचारण्यात आलं. यावर सूर्याने सर्वकाही सांगून टाकलं.
“20 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगचा निर्णय सोपा होता, मात्र 19 व्या षटकात अवघड. मोहम्मद सिराज आणि इतर काही बॉलर्सच्या कोट्यातील ओव्हर्स बाकी होत्या. मात्र रिंकू या खेळपट्टीवर प्रभावशाली ठरेल, असं मला वाटलं. मी त्याला बॉलिंग करताना पाहिलंय. तो नेट्समध्ये खूप बॉलिंग करतो. मला वाटलं की रिंकूला बॉलिंगने देणं योग्य ठरेल. मग मी त्याच्याकडून ओव्हर टाकून घेण्याचा निर्णय घेतला.
“तु स्वत: 19 वी ओव्हर का नाही टाकली?” असा प्रश्न आशिष नेहरा याने सामन्यानंतर सूर्याला केला. यावर सूर्याने हसत हसत उत्तर दिलं. “मला माहितीय की भारतीय क्रिकेटमध्ये 19 वी ओव्हर कायम अवघड असते. त्यामुळे मी रिंकूला बॉलिंग दिली. जेव्हा उजव्या हाताचा ऑफ स्पिनर डावखुऱ्या बॅट्समनला बॉलिंग करतो तेव्हा तेव्हा हे नेहमीच कठीण असते. रिंकूने हुशारीने बॉलिंग केली आणि त्याने कौशल्य दाखवून दिलं आणि माझं काम सोपं केलं.”, असं सूर्याने म्हटलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.