SL vs IND: हार्दिकची आधीच माघार! वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोण?

| Updated on: Jul 16, 2024 | 9:06 PM

IND vs SL: टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात ही 27 जुलैपासून टी 20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर उभयसंघात वनडे मालिका होणार आहे.

SL vs IND: हार्दिकची आधीच माघार! वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोण?
team india odi world cup 2023
Image Credit source: K L Rahul X Account
Follow us on

बीसीसीआय निवड समिती टीम इंडियाची श्रीलंका दौऱ्यातील टी 20i आणि वनडे सीरिजसाठी कोणत्याही क्षणी घोषणा करु शकते. या दौऱ्यात काही अनुभवी खेळाडू खेळणार की नाही? याबाबत अनिश्चिचता आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी कुणाला द्यायची? असा प्रश्नही निवड समितीसमोर आहे. विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि कॅप्टन रोहित शर्मा या तिघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या श्रीलंके विरुद्ध टी 20 मालिकेत नेतृ्त्व करणार असल्याचं समजतंय. मात्र दुसऱ्या बाजूला हाच हार्दिक वनडे सीरिजमध्ये वैयक्तिक खेळणार नसल्याचंही पुढे आलंय. त्यामुळे वनडे सीरिजमध्ये कुणाला नेतृत्वाची जबाबदारी मिळणार? असाही प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

वनडे सीरिजमधील कॅप्टन्सीसाठी केएल राहुल, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या तिघांची नावं चर्चेत आहे. टीम इंडिया श्रीलंके विरुद्ध आधी 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानतंर 3 सामन्यांचीच एकदिवसीय मालिका होणार आहे. केएल राहुलने अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितच्या अनुपस्थितीत वनडे सीरिजमध्ये कॅप्टन्सी केली होती. त्यामुळे केएलचं नाव आघाडीवर आहे.

पंत आणि सॅमसनही शर्यतीत

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने टी 20 वर्ल्ड कपमधून कमबॅक केलं. पंतची वनडेमधील आकडेवारी फारशी उल्लेखनीय नाही. मात्र टी 20 वर्ल्ड कपचा विचार करता त्याला संधी मिळू शकते. मात्र विकेटकीपर म्हणून पंतसमोर संजू सॅमसनचं आव्हान असणार आहे. सॅमसनने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध शतक खेळी केली होती. तसेच नुकत्याच झिंबाब्वे विरुद्ध झालेल्या टी 20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात त्याने 58 धावांची खेळी केली होती.

गंभीरमुळे श्रेयस अय्यर याचं कमबॅक!

गौतम गंभीरची हेड कोच म्हणून श्रीलंका दौरा ही पहिलीच परीक्षा असणार आहे. गंभीरमुळे श्रेयस अय्यर याचं टीम इंडियात कमबॅक होउ शकतं, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. श्रेयसने आयपीएल 2024 आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याच्या बीसीसीआयच्या आदेशाला केराची टोपी दाखवली होती. त्यामुळे श्रेयसला वार्षिक करारातून वगळण्यात आलं. मात्र आता श्रेयसचं कमबॅक होऊ शकतं.