श्रीलंका क्रिकेट टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. उभयसंघात पावसामुळे 47 षटकांचा सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने करो या मरो सामन्यात श्रीलंकेसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 7 विकेट्स गमावून 46 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. श्रीलंकेने या सामन्यासह मालिकाही जिंकली. श्रीलंकेने या मालिकेत सलग दुसऱ्या विजयासह 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने याविजयासह एका तपाची प्रतिक्षा अखेर संपवली. श्रीलंकेने 12 वर्षांनतंर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा केला.तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा मंगळवारी 19 नोव्हेंबरला पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे.
न्यूझीलंडचा डाव 45.1 ओव्हरमध्ये 209 धावांवर आटोपला. मार्क चॅपमन याने सर्वाधिक 76 धावा केल्या. मिच हे याने 49 धावांचं योगदान दिलं. विल यंग 26 आणि ग्लेन फिलिप्स याने 15 धावा जोडल्या. त्यामुळे न्यूझीलंडला रडतखडत 200 पार मजल मारता आली. या चौघांव्यतिरिक्त एकालाही काही खास करता आलं नाही. श्रीलंकेकडून महीश तीक्षणा आणि जेफ्री वांडरसे या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडो याने दोघांना बाद केलं. तर दुनिथ वेल्लालागे आणि कॅप्टन चरिथ असलंका या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
श्रीलंकेचीही पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला ठराविक अंतराने झटके दिले. मात्र कुसल मेंडीस याने एक बाजू लावून धरली. त्यामुळे श्रीलंकेला विजय मिळवण्यात यश आलं. कुसल श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. कुसलने 102 बॉलमध्ये 6 फोरसह नॉट आऊट 74 रन्स केल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी करत विजयात हातभार लावला. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल याने 4 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन मिचेल सँटनर,ग्लेन फिलिप्स आणि नॅथन फिलिप्स या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर एकदिवसीय मालिका जिंकली. श्रीलंकेने याआधी 2012 मध्ये अशी कामगिरी केली होती. तसेच श्रीलंकेने न्यूझीलंडला पराभूत करत मायदेशात सलग सहावी एकदिवसीय मालिका जिंकली. श्रीलंकेने याआधी 1997 आणि 2003 साली सलग 5-5 वेळा मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, कामिंडू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, जेफ्री वांडरसे, महेश तीक्षणा आणि अशिथा फर्नांडो.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, टिम रॉबिन्सन, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, इश सोधी आणि जेकब डफी.