मुंबई : क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना खेळाडू कसलीही पर्वा न करता सामोरं जातात. त्यामुळे अनेकदा दुखापतग्रस्त होतात. असे अनेक प्रसंग आतापर्यंत घडले आहेत. त्यामुळे खेळताना काही भान असणंही गरजेचं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज सरफराज अहमद दुखापतग्रस्त झाला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोची गोलंदाजी खेळताना चेंडू थेट हेल्मेटवर आदळला. चेंडूचा वेग इतका होता की, सरफराज अहमद मैदानात अस्वस्थ झाला. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मैदानात धाव घेत स्थितीचा आढावा घेतला.
पाकिस्तानी इनिंगच्या 81 व्या षटका हा प्रकार घडला. चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर पहिल्यांदा काही वाटलं नाही. पण पाच षटकानंतर म्हणजेच 86 व्या षटकात सरफराजला अस्वस्थ वाटू लागलं. षटक संपताच त्याने चक्कर असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याने फिजियोला मैदानात बोलवलं. तपासणी आणि त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मैदानाबाहेर गेला.
Sarfaraz Ahmed retired hurt on 14 runs due to a possible concussion after the ball struck on his head#PAKvSL #SLvPAK #Sarfaraz pic.twitter.com/v07SSmyoXZ
— Shakeel Khan Khattak (@ShakeelktkKhan) July 26, 2023
सरफराज अहमद रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा त्याने 22 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. असिथा फर्नांडो याच्या गोलंदाजीचा चौथा चेंडू हेल्मेटवर आदळला होता. या चेंडूवर पाकिस्तानला लेग बाय 4 धावा मिळाल्या होत्या. हा चेंडू लागूनही सरफराज मैदानात 5 षटकं तग राहून खेळला. पण त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले.
हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतर डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली. उपचारासाठी सध्या सरफराज अहमद मैदानाबाहेर आहे. बरं वाटल्यानंतर पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तानकडे टी ब्रेकपर्यंत 231 धावांचा लीड आहे. तसेच दुसराच दिवस असल्याने जिंकण्याच्या वेशीवर आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही.
पाकिस्तानने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ही मालिका पाकिस्तानने 2-0 ने जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा होणार आहे. तसेच भारताला पुढची स्पर्धा आणखी किचकट होणार आहे. कारण भारताचे पुढचे सामने दिग्गज संघांसोबत आहेत.