कोलंबो | क्रिकेट विश्वात मंगळवारी 16 जानेवारी रोजी मोठा उलटफेर झाला. लिंबुटिंबु समजल्या जाणाऱ्या मात्र उलटफेर मध्ये स्पेशालिस्ट असलेल्या झिंबाब्वेने धमाका केला. झिंब्बावेने दुसऱ्या टी 20 सामन्यात विश्वविजेत्या श्रीलंकेला दणका दिला. झिंबाब्वेने श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवत हिशोब क्लिअर केला. या 3 सामन्यांच्या मालिकेत झिंब्बावेने पहिला सामना गमावला होता. त्यामुळे दुसरा सामना हा झिंबाब्वेसाठी करो या मरो असा होता. झिंबाब्वेने दुसरा सामना जिंकला आणि मालिकेतील आव्हान कायम राखलं.
श्रीलंकेने झिंबाब्वेला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. झिंबाब्वेने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 1 बॉलआधी पूर्ण केलं. कॅप्टन सिंकदर रझा याच्या नेतृत्वात झिंबाब्वेने हा विजय मिळवला. झिंबाब्वेकडून क्रेग एर्विन याने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. ब्रायन बेनेट याने 25 धावा केल्या. तर विकेटकीपर क्लाइव्ह मदांडे आणि ल्यूक जोंगवे या दोघांनी निर्णायक आणि विजयी खेळी केली.
क्लाइव्ह मदांडे आणि ल्यूक जोंगवे या दोघांनी नाबाद अनुक्रमे 15 आणि 25 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून महीक्ष तीक्षणा आणि दुशमंथा चमीरा या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर दिलशान मधुशंका आणि कॅप्टन वानिंदु हसरंगा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी झिंबाब्वेने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. चारिथ असलंका याने 69 धावा केल्या. तर अँजलो मॅथ्यूज याने नाबाद 66 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. झिंबाब्वेकडून ल्यूक जोंगवे आणि ब्लेसिंग मुझाराबानी या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. दरम्यान मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 18 जानेवारी रोजी होणार आहे. हा तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची संधी आहे. आता कोणती टीम मालिकेसह सामना जिंकते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
झिंबाब्वेचा थरारक विजय
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 16, 2024
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | वानिंदू हसरंगा (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना आणि दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.
झिंबाब्वे प्लेईंग ईलेव्हन | सिकंदर रझा (कॅप्टन), क्रेग एर्विन, टिनाशे कमुनहुकमवे, ब्रायन बेनेट, शॉन विल्यम्स, रायन बर्ल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ल्यूक जोंगवे, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.