मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्ण पदक पटकावलं आहे. अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 116 धावा केल्या. तसेच श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं. पण श्रीलंकेला 20 षटकात 8 गडी गमवून 97 धावा करता आल्या. हा सामना भारताने 19 धावांनी जिंकत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारताची पहिली विकेट शफाली वर्मा हीच्या रुपाने संघाच्या अवघ्या 16 धावा असताना गेली. शफाली वर्मा अवघ्या 9 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स या जोडीने डाव सावरला. या दोघींना दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. या विजयानंतर स्मृती मंधाना यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
गोल्ड मेडल जिंकल्यानंतर स्मृती मंधाना हीने आपल्या भावना व्यक्त करत म्हणाली की, राष्ट्रगीतावेळी झेंडा वर जात होता. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. हा एक आनंदाचा क्षण होता. आम्ही टीव्हीवर नीरज चोप्रा याने गोल्ड जिंकल्याचं पाहिलं आहे. तो एक सुखद क्षण होता. मी आनंदी आहे. मला अभिमान वाटत आहे.” भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी चांगली खेळी केली. स्मृती मंधाने हीने 46 आणि जेमिमा रॉड्रिग्स हीने 42 धावा केल्या. या खेरीज एकही फलंदाज दुसरी आकडा गाठू शकला नाही.
तितास साधू आणि राजेश्वरी गायकवाड यांनी श्रीलंकेला 97 धावांवर रोखलं. त्याचबरोबर 18 वर्षीय तितास साधु हीने जबरदस्त कामगिरी केली. श्रीलंकेला सुरुवातीला तीन धक्के दिले आणि भारताला मजबूत स्थितीत आणलं. तितास हीने 4 षटकात फक्त 6 धावा देत 3 गडी बाद केले. तर राजेश्वरी गायकवाड यांनी दोन गडी बाद केले.
भारतीय संघ : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकार, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास साधु, राजेश्वरी गायकवाड
श्रीलंकेचा संघ : चमारी अट्टापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी, विश्मी गुणरत्ने,हसिनी पेरेला, निलाक्षी डिसिल्वा, ओशाडी रनसिंघे,कविशा दिल्हारी, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, इनोका रनविरा.