आयपीएल 2024 स्पर्धेचं पर्व नुकतंच संपलं आहे. दुसरीकडे 2025 पर्वासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. आयपीएल मेगा लिलावापूर्वी कोणाला रिलीज करायचं आणि कोणाला रिटेन ही गणितं सुरु आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याने इम्पॅक्ट प्लेयरबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अनेक गणित चुकल्याचं दिसून आलं आहे. आयपीएलमध्ये सहज 250 धावांचा पल्ला गाठत असल्याचं दिसून आलं. तसेच अतितटीच्या सामन्यातही गोलंदाजांचं काही खरं दिसत नव्हतं. कारण शेवटपर्यंत फलंदाजीचा पर्याय उपलब्ध होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी या नियमावर बोट ठेवलं होतं. आता सौरव गांगुली यावर आपलं मत मांडत सल्ला दिला आहे. नाणेफेकीवेळीच इम्पॅक्ट प्लेयरचं नाव घोषित करावं असं त्याने सांगितलं आहे. तसेच भविष्यात बाँड्रीलाईन आणखी पुढे ढकलली जाईल अशी आशाही व्यक्त केली आहे.
“मला इम्पॅक्ट प्लेयर नियम आवडतो. माझं आयपीएलबद्दल एकच म्हणणं आहे, ते म्हणजे बाँड्रीलाईन वाढवावी.” असं सौरव गांगुली याने सांगितलं. “आयपीएल ही एक चांगली स्पर्धा आहे. इम्पॅक्ट प्लेयर्सबाबतीत फक्त एकच गोष्ट करता येईल. याचा निर्णय टॉसपूर्वी व्हायला हवा. नाणेफेकीपूर्वी त्याचा खुलासा करणं कौशल्य आणि रणनितीवर अवलंबून असेल. पण मी इम्पॅक्ट प्लेयर्सच्या बाजूने आहे.”, असं सौरव गांगुली याने सांगितलं.
सौरव गांगुली याने पृथ्वी शॉबाबतही आपलं मत मांडलं. “पृथ्वी शॉ अजूनही लहान आहे. तो फक्त 23 वर्षांचा आहे. अजूनही तो टी20 कसं खेळावं हे शिकत आहे. त्याच्याकडे जबरदस्त कौशल्य आहे आणि अजून ते चांगलं होत जाईल. कधी कधी आपण कोणाकडून जास्तच अपेक्षा करून बसतो. पृथ्वी शॉचं कौशल्या पाहून तो नक्कीच चांगलं करेल याचा विश्वास आहे.”, असं सौरव गांगुलीने सांगितलं.
सौरव गांगुलीने ऋषभ पंतबाबतही सडेतोडपणे सांगितलं. ऋषभ पंतने 15 महिन्यानंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलं. तसेच आता टी20 वर्ल्डकप संघातही आहे. “आयपीएल स्पर्धा आमच्यासाठी चांगली राहिली. ऋषभने ज्या पद्धतीने कमबॅक केल ते बघून मी खूश आहे. मी कायम सांगितलं आहे की तो एक खास खेळाडू आहे.”