वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीतील अंतिम सामना जसजसा जवळ येतोय तसतशी चुरस वाढतेय. तसेच या तिसऱ्या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्येही जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे 2 संघ आघाडीवर होते. मात्र एका सामन्याच्या निकालानंतर सर्वच चित्र बदलून गेलंय. आता दोघांमध्ये तिसरा आलाय. या तिसऱ्याने दोघांचं अर्थात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचं भयंकर टेन्शन वाढलं आहे.
दक्षिण आफ्रिकेने डरबनमध्ये 30 नोव्हेंबरला श्रीलंकेचा पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी 233 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिका यासह पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकत मोठी झेप घेत दुसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. तसेच टीम इंडियाचंही टेन्शन वाढलंय. टीम इंडिया या निकालानंतरही अव्वल स्थानी कायम आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडियासाठीही ही धोक्याची घंटा आहे.
दक्षिण आफ्रिकने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी दावा ठोकला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात आणखी 1 सामना होणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात पर्थमध्ये पराभव झालाय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाची अडचण आणखी वाढू शकते. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे दोन्ही संघांचं टेन्शन वाढवलंय. त्यामुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासाठी एडलेडमध्ये होणारा दुसरा सामना हा अतिशय आव्हानात्मक असणार आहे.
दक्षिण आफ्रिका या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावरुन ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडला पछाडत 3 स्थानांची झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलीय. दक्षिण आफ्रिकेचे या सामन्याआधी पीसीटी पॉइंट्स 54.17 इतके होते जे विजयानंतर 59.26 इतके आहेत. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील पीसीटी पॉइंट्समधील अंतर फार कमी आहे. टीम इंडियाचे पीसीटी पॉइंट्स 61.11 आहेत. त्यामुळे टीम इंडियाचंही पहिलं स्थान धोक्यात आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमधील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत पोहचतात. दक्षिण आफ्रिकेला या साखळीत आणखी 3 सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेविरुद्ध 1 तर पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेने तिन्ही सामने जिंकले तर इंडिया-ऑस्ट्रेलियापैकी कोणताही एक संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर होईल इतकं मात्र निश्चित. त्यामुळे आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील उर्वरित सामन्यांमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.