वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या शर्यतीत न्यूझीलंड कसोटी होण्यापूर्वी भारताचं नाव आघाडीवर होतं. पण सलग दोन कसोटी सामन्यात पराभव होताच गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र विजयी टक्केवारी प्रचंड घसरली आहे. चुकून तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर मात्र अंतिम फेरीचं काहीच खरं नाही, असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे भारताला आता उर्वरित 6 पैकी 4 सामने काहीही करून जिंकावे लागणार आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेनेही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. दक्षिण अफ्रिकेसमोर आता सोपे पेपर असून तेही मायदेशात सोडवायचे आहेत. सध्या बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यावर दक्षिण अफ्रिकेने मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सामना दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने झुकलेला आहे.बांगलादेशचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं समीकरण संपलेलं आहे. बांगलादेशसोबत पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड स्पर्धेतून बाद झाले आहेत. मात्र दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीसाठी संधी आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण अफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 47.62 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पकडून एकूण 5 सामने दक्षिण अफ्रिकेला खेळायचे आहेत. या सर्व सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 69.44 इतकी होईल. जर भारताने उर्वरित सामन्यात पराभवाचं तोंड किंवा सामने ड्रॉ झाले तर मात्र दक्षिण अफ्रिकेला संधी मिळू शकते. कारण दक्षिण अफ्रिकेचे पुढचे चार सामने श्रीलंका आणि पाकिस्तानसोबत मायदेशात खेळायचे आहेत. त्यामुळे या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा वरचष्मा असेल.
दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला दोन्ही सामन्यात पराभूत केलं तर श्रीलंका स्पर्धेतून आणखी एक स्पर्धक आऊट होईल. तर पाकिस्तानला दोन सामन्यांच्या मालिकेत पराभूत केलं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दावा आणखी मजबूत होईल. दुसरीकडे, इंग्लंडने न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत केलं तर दक्षिण अफ्रिकेचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे श्रीलंका, भारत आणि न्यूझीलंडची वरील प्रमाणे स्थिती राहिली तर टॉप दोनमध्ये दक्षिण अफ्रिकेला संधी मिळेल. अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होऊ शकतो.