T20 वर्ल्ड कप 2024 जिंकणारा भारतीय संघ एअर इंडियाच्या चार्टर्ड फ्लाइटने गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल होणार आहे. टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीकडे रवाना झाली. टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मुंबईला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू दिल्लीच्या हॉटेल मौर्यामध्ये विश्रांती घेणार आहेत. हॉटेल मौर्याचा परिसरही पोलिसांनी वेढला असून टीम इंडियाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. तसेच, निमलष्करी दलही सुरक्षेसाठी तयार आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला IGI विमानतळावरून मौर्या हॉटेलपर्यंत सुरक्षितपणे नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टीम इंडिया विमानतळावरून मौर्या हॉटेलसाठी निघेल तेव्हा सशस्त्र पोलिस कर्मचारी तेथे उपस्थित असतील. एक एस्कॉर्ट वाहन त्यांच्यासोबत असेल. भारतीय खेळाडू ज्या विमानात आहेत विमान गुरुवारी सकाळी 6 वाजता दिल्लीत उतरणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
विमानतळ ते हॉटेल या मार्गावर प्रत्येक पायरीवर निमलष्करी दल तैनात केले जाणार आहे. निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या हॉटेलकडे जाणारा रस्ता आणि हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरावरही लक्ष ठेवणार आहेत. भारतीय संघाला भेटण्यासाठी विमानतळ आणि हॉटेलमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी टीम इंडिया जाईल. तिथे टीम इंडिया पंतप्रधान यांच्यासोबत नाश्ता करतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता टीम इंडिया दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहे. दरम्यान, कप्तान रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय यांनी चाहत्यांना 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता मरीन ड्राइव्हवर पोहोचण्याची विनंती केली आहे. येथे टीम इंडियाची विजय परेड होणार आहे.
T20 विश्वचषक अंतिम सामन्यानंतर रविवारी बार्बाडोसमध्ये अचानक वादळ धडकले होते. त्यामुळे येथे संचारबंदी लागू करण्यात आल्याने भारतीय क्रिकेट संघ तीन दिवस बार्बाडोसमध्ये अडकून पडला होता. बीसीसीआयने विशेष चार्टर्ड फ्लाइट पाठवून टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची व्यवस्था केली. अखेर, बुधवारी बार्बाडोसहून विशेष चार्टर्ड विमानाने टीम इंडिया भारताकडे रवाना झाली.