मुंबई: भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे जीवकी प्राण. त्यामुळेच आपले लाडके क्रिकेटपटू एखाद्या हिरोपेक्षा कमी नसतात. भारतीयांच्या क्रिकेटपटूंप्रतिच्या श्रद्धेनेच सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव केलं आहे. आता सचिननंतर कोणता फलंदाज भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनावर अदिराज्य गाजवत असेल, तर तो म्हणजे किंग कोहली अर्थात विराट कोहली. विराट म्हणजे भारतीय क्रिकेटला मिळालेला असा हिरा आहे. ज्याची सर जगातील कोणत्या फलंदाजात नाही. कोहलीने सचिनचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत, तर स्वत:चे अनेक रेकॉर्डही बनवले आहेत. अलीकडच्या फलंदाजाची तुलना कोहलीबरोबर होते. कारण कोहली हा खेळाडू नसून सध्याच्या क्रिकेट जगतातील सर्वोच्चतेचं परिमाण आहे. पण हाच कोहली सध्या थोड्या खराब फॉर्ममध्ये असल्याचं दिसून येत आहे. गेली दोन वर्ष एकही शतक नाही, महत्त्वाच्या अशा आयसीसी स्पर्धांमध्ये पराभव या साऱ्यानंतर आता टी20 संघाच्या कर्णधारपदाचाही कोहलीने राजीनामा दिला. ज्यानंतर त्याच्या फॅन्सचं मन तर तुटलंच आहे, पण विराटपर्व संपणार का? हा त्रासदायक प्रश्नही सतावू लागला आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब होती. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाला स्पर्धेत पुनरागमन करता आले नाही. ज्यामुळे सेमीफायनलच्या पूर्वीच भारतीय संघ स्पर्धेबाहेर गेला. त्यानंतर आता मात्र भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. विश्वचषकाची फायनल होताच, किवी खेळाडू भारताच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी 3 कसोटी आणि 2 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी भारताने संघनिवड नुकतीच जाहीर केली. त्यात विश्वचषकाच्या सामन्यापूर्वीच विराटने टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार हे जाहीर केल्याने तो संघाचा कर्णधार नसून रोहितवर ही जबाबदारी आहे. त्यात दिग्गज खेळाडूंना विश्रांती म्हणून विराट संघातही नाही. तर दुसरीकडे कसोटी संघाच्या पहिल्या सामन्याचं नेतृत्त्व अजिंक्यला दिलं असून दुसऱ्या सामन्यात कोहलीकडे कर्णधारपद असेल. पण या दोन्ही संघातही कोहली नसल्याने मूळात कर्णधारपदावर कोहलीच्या जागी दुसरं नाव पाहिल्याने कोहली फॅन्ससह अनेक भारतीयांना थोडं वेगळं वाटलं असणार हे नक्की! यामागे विश्रांती आणि संघबदल ही कारणं असली तरी कुठेतरी विराटचा सुमार फॉर्मही चिंताजनक आहे.
दरम्यान मागील काही काळातील विराटचा फॉर्म चिंताजनक असला तरी विराट कोहली हा अजूनही जगातील अव्वल फलंदाजामध्येच आहे. याचं कारण विराट हा संघासाठी फक्त एक उत्कृष्ट फलंदाज नसून एक मेहनती आणि महत्त्वकांक्षी कर्णधारही आहे. कसोटी सामन्यात भारताने सर्वात चांगले दिवस विराटच्या नेतृत्त्वाखालीच पाहिले आहेत. विशेष म्हणजे विराट हा उत्तम फलंदाज असण्यासोबत एक फिनीशर आहे. तोही अगदी सुरुवातीपासून क्रिजवर टिकून सामना संपवण्याची ताकद विराटमध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट सिरीजमध्ये भारत पराभूत झाला. पण त्या सामन्यातही विराटने पहिल्या सामन्यात 44 धावांची खेळी खेळली होती, जी भारतासाठी एक आशेची किरण होती. पण दुसऱ्या डावात विराट कमाल करु शकला नाही. ज्यानंतर आता विश्वचषकातही सर्वात पहिला सामना जो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही विराटने एकट्याने भारताकडून अर्धशतक लगावलं. पण तरी भारत पराभूत झाला. त्यामुळे अशा काही खेळ्यांमधून विराटचा नसलेला फॉर्मही कित्येक खेळाडूंच्या फॉर्मपेक्षाही भारी आहे, म्हणू शकतो. पण या सर्वांनंतरही विराटला आगामी काही काळात आपला जुना धाकड फॉर्म परत आणन गरजेचं आहे. त्यानंतरच विराट आणि भारतीय संघ यशाच्या शिखरावार पोहचू शकतो.
आंतरराष्ट्रीय सामन्यांत शतक किंवा अर्धशतक ठोकण्याचा विराट कोहलीची सरासरी उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत 115 अर्धशतकं तर 70 शतकं केली आहेत. याचा अर्थ कोहली दर 2.64 सामन्यांनतर शतक किंवा अर्धशतक ठोकतो. या सरासरीने कोहली चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोहलीपेक्षा केवळ 0.4 च्या फरकाने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा नंबर लागतो. तर तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे.
विराटने आतापर्यंत 96 कसोटी सामन्याच्या 162 डावांत 7 हजार 765 धावा केल्या आहेत. यामध्ये 27 शतकं आणि अर्धशतकं आहेत. त्याचा कसोटीतील सर्वोच्च स्कोर 254 इतका आहे. एकदिवसीय सामन्यांचा विचार करता कोहलीने 254 सामन्यांतील 245 डावांत तब्बल 12 हजार 169 धावा केल्या आहे. त्याने 43 शतकं आणि 62 अर्धशतकं ठोकली आहे. त्याचा सर्वोच्च स्कोर 183 आहे. तर टी20 सामन्यात कोहलीने 94 सामन्यांच्या 87 डावांत 3 हजार 227 धावा केल्या असून त्यामध्ये त्याने 29 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर 94 आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी करत सर्व फॉरमॅटमधील एकूण 482 सामन्यांत 70 शतकं ठोकली आहेत. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान कामगिरी असली तरी नोव्हेंबर 2019 पासून मात्र कोहली एकही आतंरराष्ट्रीय शतक ठोकू शकला नाही. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये ईडन गार्डन्समध्ये बांग्लादेशविरोधात 136 धावा केल्या होत्या. तेव्हापासून त्याने एकही शतक झळकावलं नाही.
हे ही वाचा
सानिया मिर्झाने पाकिस्तानला पाठिंबा देताच भारतीय नाराज, म्हणाले ‘पाकिस्तानातच जाऊन राहा…’
IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण
टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित