मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्त्व रद्द केलं आहे. आयसीसीने यांसदर्भात ट्विट करत माहिती दिलीये. श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीनंतर श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं होतं. त्यानंतर आयसीसी हे कठोर पाऊल उचललं आहे. आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये, श्रीलंका क्रिकेट स्वतंत्रपणे आपला कारभार पाहू शकत नसल्याचं म्हटलं आहे.
श्रीलंका क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संसदेने गुरुवारी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा दिला. क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं होतं. त्यानंतर श्रीलेकेचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यांची क्रिकेट बोर्ड चालवण्यासाठी सात सदस्यीय अंतरिम समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
Sri Lanka Cricket suspended by ICC Board.
More here ⬇️https://t.co/3QcLinUPp0
— ICC (@ICC) November 10, 2023
आयसीसीची बैठक पार पडली यामध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्ड सदस्य म्हणून नियमांचं उल्लंघन करत आहे. विशेष करून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कारभार किंवा प्रशासनात सरकारी हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 21 नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे, त्यानंतर पुढील पावले उचलली जातील आणि अटी ठरवल्या जातील, असं आयसीसीने म्हटलं आहे.
श्रीलंका संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नऊ पैकी फक्त दोनच सामने जिंकू शकला, ही त्यांची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी राहिली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात तर श्रीलंकेचा संघ अवघ्या 56 धावांवर ऑल आऊट झाला होता.