भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 आणि वनडे मालिका पार पडली. यात टी20 मध्ये भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर वनडे मालिकेत श्रीलंकेने भारताला पराभूत केलं. वनडे मालिकेतील विजयानंतर श्रीलंका क्रिकेटचं नवं पर्व सुरु झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण 27 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेने भारताला द्विपक्षीय मालिकेत पराभूत केलं. असं असताना श्रीलंकेतून एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. कारण क्रीडाप्रेमी फिक्सिंगचा आरोप सहनच करू शकत नाहीत. श्रीलंकेच्या एका खेळाडूवर फिक्सिंगचे आरोप लागले आहेत. या प्रकरणी आयसीसीने दखल घेतली असून उत्तर मागितलं आहे. त्यामुळे खेळाडूवर बंदीची टांगती तलवार आहे. आयसीसीने श्रीलंकेच्या प्रवीण जयविक्रमा याच्यावर आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन आरोप केले आहेत. आता जयविक्रमाकडे उत्तर देण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 पासून 14 दिवसांचा अवधी आहे.
आयसीसीने आपल्या अहवालात म्हंटलं आहे की, 2.4.4, 2.4.4 आणि 2.4.7 अंतर्गत प्रवीण जयविक्रमावर आरोप आहेत. यात प्रवीण जयविक्रमाला फिक्सिंग करण्यासाठी संपर्क साधला गेला होता. त्याने याबाबतची माहिती तात्काळ क्रिकेड मंडळ किंवा आयसीसी भ्रष्टाचारविरोधी समितीला कळवणं गरजेचं होतं. पण त्याने तसं केलं नाही. इतकंच काय तर इतर खेळाडूंशी संपर्क साधल्याची वस्तुस्थिती लपवली. तसेच भ्रष्ट कामासाठीचे संपर्क आणि मेसेज डिलिट करून भ्रष्टाचारविरोधी समितीच्या तपासणीत अडसर आणला. आता आयसीसीने कलम 1.7.4.1 आणि 1.81 नुसार प्रवीण जयविक्रमावर कारवाई करेल. यासाठी श्रीलंका क्रिकेट आणि आयसीसीने होकार दिला आहे.
प्रवीण जयविक्रमा श्रीलंकेकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला आहे. आतापर्यंत 5 कसोटी, 5 वनडे आणि 5 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला आहे. कसोटीत त्याच्या नावावर 25 विकेट्स आहेत. तसेच वनडेत 5 आणि टी20 सामन्यात दोन विकेट घेतल्या आहेत. प्रवीण जयविक्रमाने 2022 मध्ये श्रीलंकेसाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर संघात परतला नाही. त्यात प्रवीण जयविक्रमाने भारताविरुद्ध 4 सामने खेळला असून त्यात 10 विकेट घेतल्या आहेत.