वनडे मालिकेत श्रीलंकन संघ टीम इंडियावर भारी पडला आहे. 50 षटकात 250 च्या आत धावा करणंही भारताला कठीण करून टाकलं आहे. असं एकदा नाही तर दोनदा घडलं. पहिल्या वनडेत 230 आणि दुसऱ्या वनडेत 240 धावा भारताला करता आल्या नाहीत. आता तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कस लागणार आहे. कारण हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. असं असताना वनडे मालिकेतील एक मोठी गडबड समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार शेवटचा वनडे सामना टाय झाला तर सुपर ओव्हर केली जाईल. जर शेवटच्या सामन्यासाठी सुपर ओव्हर असणार आहे. तर पहिल्या वनडेसाठी का नव्हती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या एक अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा करत सांगितलं की, पहिल्या वनडे सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही.
पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 230 धावा केल्या आणि विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं. पण भारताला सर्व गडीबाद 230 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. खरं तर आयसीसीच्या नियमानुसार, सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर व्हायला हवी होती. पण आयसीसी मॅच रेफरी रंजन मदुगलेने तसं केलं नाही. इतकंच नाही तर मैदानातील पंच आणि तिसऱ्या चौथ्या पंचांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या सर्वांना सुपर ओव्हर नियमाबाबत माहिती नव्हतं का? असा प्रश्न क्रीडप्रेमी उपस्थित करत आहेत.
आयसीसी नियमानुसार, दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत असेल तेव्हा विजयी घोषित करण्यासाठी सुपर ओव्हर होणं गरजेचं आहे. जर सुपर ओव्हरमध्येही तशीच स्थिती झाली तर जिंकेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. पण आयसीसीचा हा नियम भारत श्रीलंका वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर लागू झाला नाही. त्यामुळे त्याचा फटका कुठे ना कुठे तरी टीम इंडियाला बसला. सुपर ओव्हरमध्ये भारताने सामना जिंकला असता तर आज मालिकेत 1-1 ने बरोबरी असती. आता आयसीसी या चुकीवर नेमकं काय उत्तर देतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.