श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची टी 20 मालिका आटोपली आहे. टीम इंडियाने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. वनडे सीरिजसाठी अनेक अनुभवी खेळाडूचं कमबॅक झालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया या मालिकेत खेळणार आहे. रोहितसह, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांचं एकदिवसीय संघात पुनरागमन होणार आहे. तर चरिथ असालंका याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. एकदिवसीय मालिकेनिमित्ताने उभयसंघाची एकमेकांविरुद्धची आकडेवारी जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 168 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने यापैकी 99 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला 57 सामन्यात यश आलं आहे. 1 सामना हा टाय तर 11 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. आकडेवारीनुसार, टीम इंडियाच श्रीलंकेवर वरचढ आहे. तसेच टीम इंडियाने गेल्या 6 सामन्यात श्रीलंके विरुद्ध विजय मिळवला आहे. उभयसंघातील शेवटची द्विपक्षीय मालिका ही 2021 साली खेळवण्यात आली होती.
दोन्ही संघात 20 एकदिवसीय मालिका झाल्या आहेत. त्यापैकी 15 मालिका भारताने जिंकल्या आहेत. टीम इंडियाने भारतात 10 आणि श्रीलंकेत 5 मालिका जिंकल्या आहेत. तर श्रीलंकेला फक्त 2 मालिकांमध्येच यश आलं आहे. श्रीलंकेने दोन्ही मालिका या मायदेशातच जिंकल्या आहेत. तसेच 3 मालिका बरोबरीत सुटल्या. श्रीलंकेने आपल्या घरात 28 सामने जिंकले आहेत. तर 32 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.
श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.