SL vs NZ : कसोटीचा पहिला दिवस श्रीलंकेच्या नावावर, कामिंदू मेंडिसच्या शतकानं तारलं

| Updated on: Sep 18, 2024 | 6:39 PM

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यातील पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 7 गडी बाद 302 धावा केल्या. कामिंदू मेंडिसने यावेळी दमदार शतक ठोकलं.

SL vs NZ : कसोटीचा पहिला दिवस श्रीलंकेच्या नावावर, कामिंदू मेंडिसच्या शतकानं तारलं
Follow us on

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. कर्णधार धनंजय डिसिल्वाने क्षणाचाही विलंब न करता फलंदाजीचा निर्णय घेतला. पण श्रीलंकेची सुरुवात काही चांगली झाली नाही. दिमुथ करुणारत्नेच्या रुपाने श्रीलंकेला पहिला धक्का बसला. तेव्हा संघाच्या फक्त 20 धावा होत्या. त्यानंतर संघाची धावसंख्या 33 असताना पाथुम निसंका वैयक्तिक 27 धावा करून तंबूत परतला. दिनेश चंडिमलने 71 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 30 धावा केल्या. तर अँजेलो मॅथ्युज दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला आणि फलंदाजीला कर्णधार धंनजय डिसिल्वा फलंदाजीला आला. पण त्याला काही खास करता आलं नाही. अवघ्या 11 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे अँजेलो मॅथ्यूज पुन्हा एकदा मैदानात उतरला. त्याने कामिंदूसोबत 72 धावांची भागीदारी केली. पण विल्यम ओरूकेच्या गोलंजीवर टॉम ब्लंडेलने झेल पकडला आणि त्याची खेळी 36 धावांवर संपुष्टात आली.

संघ अडचणीत असताना कामिंदू मेंडिस आणि कुसल मेंडिसने मोर्चा सांभाळला. सहाव्या विकेट दोघांनी मिळून 103 धावांची भागीदारी केली. कामिंदू मेंडिसने 173 चेंडूत 11 चौकाराच्या मदतीने 114 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 68 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाच्या खेळ संपण्यापूर्वी कामिंदू मेंडिसची विकेट पडली. तेव्हा श्रीलंकेच्या 7 गडी बाद 302 धावा झाल्या होत्या. रमेश मेंडिस नाबाद 14, तर प्रबाथ जयसूर्या नाबाद 0 धावांवर आहे. विल्यम ओरुकेने 3, ग्लेन फिलिप्सने 2, टिम साउथीने 1 आणि एजाज पटेलने 1 विकेट घेतली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या दृष्टीने न्यूझीलंडसाठी हा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ विजयी टक्केवारी 50 सह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या मालिकेवर पुढचं गणित ठरणार आहे. या मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर पुढचं गणित कठीण होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊथी (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओरुके.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डीसिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.