IND vs AUS: अश्विनच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाचं नुकसान? सुनील गावस्कर भडकले आणि म्हणाले..

| Updated on: Dec 18, 2024 | 7:22 PM

भारत ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असला तरी आर अश्विनच्या निवृत्तीमुळे दिवस गाजला. आर अश्विनने घेतलेल्या निवृत्तीमुळे चर्चांचे फड रंगले आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

IND vs AUS: अश्विनच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाचं नुकसान? सुनील गावस्कर भडकले आणि म्हणाले..
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 1-1 ने बरोबरी आहे. तर दोन सामने अजूनही शिल्लक आहेत. असं असताना दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. पण आर अश्विनच्या निवृत्तीचं टायमिंग पाहून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत. अश्विनने संघाला असं मध्यात सोडून जाणं काही योग्य नाही, असं सुनील गावस्कर यांनी स्पष्ट सांगितलं. गावस्कर यांनी ब्रॉडकास्टरशी बोलताना सांगितलं की, ‘तो सांगू शकला असता की या मालिकेनंतर मी भारतीय संघासाठी निवडीसाठी उपलब्ध नसेल. याला काय अर्थ आहे. महेंद्रसिंह धोनीनेही याच पद्धतीने 2014-15 मध्ये सीरिजमध्येच तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेतली होती. यामुळे संघाचा एक खेळाडू कमी होतो.’

‘निवड समितीने काही तरी लक्ष्य ठेवूनच इतक्या साऱ्या खेळाडूंची निवड केली आहे. जर एखादा खेळाडू जखमी होतो तेव्हा राखीव खेळाडूंपैकी एकाच निवड केली जाऊ शकते. अश्विन सिडनीत होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात आपली भूमिका बजावू शकला असता. सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये फिरकीपटूंना मदत मिळते. भारताला तिथे दोन फिरकीपटूंसह खेळू शकतो. त्याला त्या सामन्यात असायला हवं होतं. मला माहिती नाही मेलबर्नची विकेट कशी आहे. त्यामुळे आपलं लक्ष्य या सामन्याच्या शेवटच्या मॅचवर जातं.’, अस माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

आर अश्विनची जागा वॉशिंग्टन सुंदर मिळेल का? असा प्रश्न विचारल्यावर सुनील गावस्कर म्हणाले की “मला वाटते की वॉशिंग्टन सुंदर त्याच्या पुढे आहे. रोहित शर्मा म्हणाला की अश्विन उद्या घरी परतत आहे. त्यामुळे अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा शेवट आहे. तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता.” दरम्यान, भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने खूपच महत्त्वाचे आहेत. या दोन सामन्यात विजय मिळवला तर भारताचं अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे.