टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाच्या या फॉर्मेटमध्ये बरीच उलथापालथ झाली. कारण कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेताच दोन जागा रिकाम्या झाल्या. इतकंच काय तर कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार याची खलबतं सुरु झाली. टी20 वर्ल्डकपमध्ये उपकर्णधारपद भूषविलेल्या हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळणार असं वाटत असताना सूर्यकुमार यादवच्या गळ्यात माळ पडली. श्रीलंका दौऱ्यापूर्वी हा निर्णय घेतला गेला. इतकंच काय तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेला धोबीपछाड दिला. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने मात दिली. यामुळे सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद 2026 टी20 वर्ल्डकपपर्यंत शाबूत राहिल असं क्रीडाप्रेमींना वाटलं. पण दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा कर्णधारपद मिळू शकतं असं त्यांनी सांगितलं आहे. हर्षा भोगले यांचा क्रिकेटसोबतचा अनुभव आणि संपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.
समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं की, हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा टी20 संघाचं कर्णधारपद मिळू शकते. हर्षा भोगले यांनी या मागचं कारणही सांगितलं. हर्षा भोगले यांच्या मते मॅनेजमेंटने हार्दिक पांड्याला सर्व व्हाईट बॉल सामने खेळण्यास सांगितले आहेत. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदाचे दरवाजे खुले आहेत. मॅनेजमेंट सूर्यकुमार यादव याची चाचणी घेत आहे. हार्दिक पांड्याला फिट राहावं लागेल आणि कर्णधारपदासाठी सर्व व्हाईट बॉल सामने खेळावे लागतील.
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संयुक्तिकरित्या पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांनी टी20 संघाच्या नव्या कर्णधाराबाबत आपलं मत स्पष्ट केलं होतं. अजित आगरकर यांनी सांगितलं होतं की, ‘सूर्यकुमार यादव एक चांगला पर्याय आहे. त्याने आपली क्षमता दाखवली आहे. तर हार्दिक आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्यासारखं टॅलेंट मिळवणं कठीण आहे. पण त्याचं फिटनेस मागच्या दोन वर्षात आव्हान राहिलं आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून कायम उपलब्ध असेल अशा खेळाडूची निवड केली. तो आपली भूमिका चोखपणे बजावू शकेल. सूर्यकुमार यादवमध्ये त्या सर्व क्षमता आहेत.’